ताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचेसंपादकीय

गांभीर्य हवा प्रदूषणाचे… भाग १. मुंबईमध्ये प्रदूषणाची पातळी झपाट्याने वाढत आहे


 

गांभीर्य हवा प्रदूषणाचे… भाग १.

मुंबई ही देशाची राजधानी असली तरी जागतिक सर्वात प्रदूषित राजधानी म्हणून प्रसिद्ध होत आहे. मुंबईमध्ये प्रदूषणाची पातळी झपाट्याने वाढत आहे, याचा अनुभव वेळोवेळी येत आहे. यापूर्वी 1981 मध्ये प्रसिद्ध झालेल्या जागतिक हवामान दर्जा अहवालातून ही बाब समोर आली होतीच! दिल्ली ही जगातील सर्वाधिक प्रदूषणकारी राजधानी असल्याचंही त्यात म्हटलं होतं. अलीकडे, 2020 मध्ये प्रदूषणाच्या बाबतीत मुंबईला जगातील 141 व्या क्रमांकावर गणण्यात आले होते. मुंबई शहर 2021 मध्ये जगातील क्रमवारीत 121व्या क्रमांकावर आले. केवळ मुंबईत प्रदूषित आहे असं नाही, तर महाराष्ट्रातील जवळजवळ सर्वच प्रमुख शहरे हवा प्रदूषणाच्या विळख्यात येत आहेत, ही बाब नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत गंभीर आहे. महाराष्ट्रातील ही शहरे वायु प्रदूषणाच्या वाईट स्थितीत पोहोचल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे, यावर सरकारने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे महाराष्ट्रातील 18 शहरांमधील हवा प्रदूषित असल्याचे 2020 मध्ये जाहीर करण्यात आले होते. मुंबई, नाशिक, नवी मुंबई, पुणे, बदलापूर, उल्हासनगर, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, नागपूर, अमरावती, चंद्रपूर, लातूर, जळगाव, अकोला आणि जालना या शहरांमध्ये हवा प्रदूषित असल्याची माहिती प्रकाशित झाली होती, आणि योग्य त्या उपाययोजनांच्या कृती आराखड्याची अंमलबजावणी करण्याची निर्देश देण्यात आले होते. त्यानंतर आणखी तीन शहरांमध्येही हवा प्रदूषित असल्याचा अहवाल केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळांनी दिला होता, ज्यामध्ये डोंबिवली ठाणे आणि पिंपरी चिंचवड या महानगरपालिकेचा समावेश होता. म्हणजे राज्यातील एकूण 21 प्रमुख शहरांतील दूषित हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळांच्या सूचनेनुसार कृती आराखड्याची योग्य अंमलबजावणी करण्याबाबत पाऊले उचलली असतील तर ती पुरेशी आहेत का? याची देखील खातरजमा केली पाहिजे.

औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र, घनकचऱ्याचे ज्वलन, घरगुती इंधनज्वलन आणि वाहनाद्वारे होणारे वायू उत्सर्जन हे महाराष्ट्रातील प्रदूषणाचे मुख्य स्रोत आहेत. महाराष्ट्र हा हवा प्रदूषणात केलेल्या वर्गवारी मध्ये “धोकादायक” वर्गात गणला जातो. वाढत्या प्रदूषणामुळे महाराष्ट्राला ”अति धोकादायक” वर्गात गणले जाण्याची शक्यता आहे. हवा प्रदूषणाच्या स्रोतांचे जे मूल्यमापन 2005 ते 2009 आणि 2010 ते 2014 तसेच 2015 ते 2019 या तीन टप्प्यावर करण्यात आले होते, त्यावरून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रामधून होणाऱ्या उत्सर्जनाचा वाटा २०१५ ते २०१९ या काळात ३९% टक्के होता. याकाळात सेंद्रिय घनकचरा जाळल्यामुळे होणारे वायू प्रदूषण २४ टक्यावरून १८ टक्क्यावर आले होते आणि वाहनातून उत्सर्जित होणाऱ्या हवा प्रदूषकांचे प्रमाण 14 ते 15 टक्के होते. महाराष्ट्रातील या शहरांमध्ये हवेची गुणवत्ता तपासणारी केंद्रे उभी करण्यात आली आहेत. या केंद्रांद्वारे भूपृष्ठापासून मानवी वावर असलेल्या वातावरणातील वेगवेगळ्या स्तरांमध्ये हवेत पसरलेले धुळीचे कण, धूर, धुके, नत्रकण, अर्धज्वलित कर्बकण, सल्फरचे कण यांचे एकत्रित मोजमाप करता येते. पॅरामीटर एरोसोल ऑप्टिकल डेप्थ या एककामध्ये मोजमाप करून हवेची गुणवत्ता ठरविता येते. प्रदूषकांचे वातावरणात किती प्रमाण आहे, यावरून त्यांचे परिणाम ठरविता येतात. हवेची गुणवत्ता ढासळली की आजारी माणसांना आणि लहान मुलांना अधिक त्रास होतो. अनेकदा, हे हवा प्रदूषण धोकादायक पातळी ओलांडल्यामुळे लहान मुलांच्या आणि जेष्ठ नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्यामुळे रुग्णालयात धाव घेणे क्रमप्राप्त प्राप्त होते. त्यामुळे जनजागृतीसाठी वेळोवेळी हे अहवाल उपलब्ध केले जात असतात.

महाराष्ट्रातील उपरोक्त २१ शहरांमधील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी केवळ केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळांनी सूचना दिली होती आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने राज्यातील संबंधित महानगरपालिका प्रशासनाला अंमलबजावणीसाठी कृती अवा आराखडा तयार करून दिला होता, एवढ्यावरच काम भागत नाही. त्यांनी सुचविलेल्या योग्य उपाय योजना राबविण्यात आल्या आहेत की नाही याचाही आढावा घेणे व अभ्यास करणे आवश्यक आहे, पण तो होताना दिसत नाही. हवा प्रदूषणामुळे केवळ मानवी आरोग्यावरच परिणाम होतो असे नाही, तर या हवेत जे विषारी घटक असतात, त्यांचा मानवासह सर्व सजींना सजीवांवरही विपरीत परिणाम होत असतो. तो परिणाम रोखण्याची जबाबदारी ही शासकीय प्रशासन नियंत्रण प्रणाली, प्रदूषण नियंत्रण प्रणाली, जबाबदार शासकीय संस्था आणि नागरिकांचीही आहे. पण त्यावर गांभीर्याने विचार होताना दिसत नसल्यामुळे हवा प्रदूषणाचा हा धोका वाढतच जाणार आहे, असे आज तरी म्हणावे लागेल.

प्रा.डॉ.बी.एल.चव्हाण, पर्यावरणतज्ञ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button