व्हिडिओ न्युज

Video आमदाराने मतदाराच्या लगावली कानशिलात, मिळालं जशास तसं उत्तर


आंध्र प्रदेशमध्ये आमदाराने मतदान करण्यासाठी आलेल्या नागरिकाच्या कानशिलात लगावल्याची घटना समोर आली आहे. आमदार महोदय रांग मोडून पुढे जाण्याचा प्रयत्न करत असताना, मतदाराने यावर आक्षेप घेतला.यावरुन झालेल्या बाचाबाचीनंतर आमदाराने मतदाराच्या कानशिलात लगावल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. गुंटूर जिल्ह्यातील एका मतदान केंद्रावर ही घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वायएसआर काँग्रेस पक्षाचे तेनाली येथील आमदार ए शिवकुमार हे मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचले होते. तेथे उपस्थित असलेला एक व्यक्ती आणि शिवकुमार यांच्या काहीतरी वाद झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र वाद नेमका कशामुळे झाला हे व्हिडीओत काही दिसत नाही.

व्हिडीओतील दृश्यांनुसार, आमदार ए शिवकुमार एका व्यक्तीकडे जातात आणि त्याला जोरदार झापड मारतात. त्यानंतर संतापलेल्या व्यक्तीने देखील लगेच आमदारांना जशासतसं उत्तर देत कानशिलात लगावली. मात्र त्यानंतर शिवकुमार यांच्यासोबत असलेले कार्यकर्ते या व्यक्तीवर तुटून पडले. त्यांनी या व्यक्तीला बेदम मारहाण केली.

यावेळी कोणत्याही सुरक्षा कर्मचाऱ्याने मध्यस्थी केल्याचं दिसत नाही. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर आमदार शिवकुमार यांच्यावर जोरदार टीका होत आहे.

वायएसआरचे आमदार अब्दुल हाफीज खान यांनी याबाबत म्हटलं की, “या व्हिडीओची सत्यता आम्ही पडताळून पाहत आहोत. शिवकुमार यांची बदनामी करण्याचा हा कट आहे.” तर टीडीपीचे प्रवक्ते जोत्स्ना तिरुनागी यांनी म्हटलं की, “सत्ताधारी पक्षाला पराभवाची खात्री असल्याने ही हतबलता दिसत आहे. लोक आता असला मुर्खपणा सहन करणार नाही, हे या घटनेतून दिसून येत आहे.”


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button