क्राईमपुणे

वृद्ध आईच्या शुश्रूषेसाठी आणलेल्या तरुणीला मद्य पाजून केला बलात्कार


व्रद्ध आणि आजारी आईच्या सेवा-शुश्रूषेसाठी नेमलेल्या तरुणीवर जबरदस्तीने बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या तरुणीवर घरात तसेच खडकवासला येथील लॉजवर जबरदस्तीने दारू पाजून लैंगिक अत्याचार करण्यात आले.या प्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी बांधकाम व्यावसायिकाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. हा प्रकार एप्रिल २०२४ ते ११ मे २०२४ या कालावधीत घडला.

प्रवीण बंब (वय ४५, रा. लालबाग सोसायटी, मार्केट यार्ड रोड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. बंब याच्यावर भादंवि ३७६, ३७६ (२) एन, ३६६, ३५४ अ, ३२३, ५०६ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी २४ वर्षीय पीडित तरुणीने फिर्याद दिली आहे. ही मुलगी मुळची अहमदनगर जिल्ह्यातील आहे. ती लहान असतानाच तिच्या आई-वडिलांचे अपघाती निधन झाले होते. ती लहानपणापासून आजीकडे राहात होती. २०२१ साली तिच्या आजीचे निधन झाले. आजीच्या मृत्यूनंतर ती चुलत मामाकडे पुण्यात राहण्यास आली. जानेवारी २०२४ मध्ये घरात बसून ती वर्तमानपत्र वाचत होती. त्यामध्ये एक जाहिरात आली होती. ‘एका ब्यूरो’द्वारे जाहिरात दिली होती. वयस्कर आजीला सांभाळण्यासाठी मुलीची आवश्यकता असल्याची ती जाहिरात होती. जाहिरातीमध्ये देण्यात आलेल्या मोबाईल नंबरवर तिने संपर्क साधला. त्यावेळी ब्यूरोच्या माणसाने लालबाग सोसायटीत राहणाऱ्या सुशीला बंब यांना सांभाळायचे असल्याचे आणि राहण्या-खाण्याच्या सोईसस वीस हजार रुपये पगार असल्याचे सांगितले. तिच्या मामाने ही नोकरी करण्यासाठी परवानगी दिली. त्यानंतर तरुणी कामासाठी बंब यांच्या घरी गेली. ९ जानेवारी २०२४ पासून ती कामावर रुजू झाली.

घरात सुशीला यांच्यासह त्यांचा मुलगा प्रवीण, त्याची पत्नी व दोन मुली, मुलगा असे राहावयास आहेत. प्रवीणची पत्नी सतत आजारी असते. फिर्यादी तरुणी सुशीला यांच्या खोलीमध्ये राहात होती. जानेवारी ते मार्चपर्यंत तिची पगार व राहण्या-खाण्याची सोय चांगली होती. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात प्रवीण सुशीला यांना बघण्याच्या बहाण्याने दररोज खोलीमध्ये येऊ लागला. या तरुणीसोबत चेष्टा व विनोद करू लागला. त्यानंतर त्याने संधी साधत ‘तू मला खूप आवडतेस. मला तुला किस करायचे आहे,’ असे म्हटले. तरुणीने नकार दिला असता तिला ब्यूरोवाल्यांना सांगून कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या तरुणीने कोणाला काहीही सांगितले नाही. जेव्हा घरी कुणी नसेल तेव्हा तो खोलीमध्ये येऊन जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करायचा. एके दिवशी रात्री त्याच्या मुली सत्संगसाठी गेलेल्या होत्या. तेव्हा त्याची पत्नी रुग्णालयात दाखल होती. त्यावेळी प्रवीणने तिला एकटी गाठून आपल्या बेडरूममध्ये नेले. तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. याबाबत कोणालाही काही सांगितले तर गळा दाबून मारून टाकण्याची धमकी दिली.

११ मे रोजी दुपारी त्याने तिला जबरदस्तीने घराच्या खाली रस्त्यावर उभे राहण्यास सांगितले. मामाकडे जात असल्याचे कारण देण्यास बजावले. घाबरलेल्या मुलीने मामाला फोन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने फोन करू दिला नाही. ती घाबरून खाली गेली. थोड्या वेळाने तो कार घेऊन आला. तिला कारमध्ये बसवून ‘चल आपण मस्त मज्जा करू, मला माझ्या बायकोकडून जे भेटत नाही, ते तुझ्याकडून मला भेटेल’ असे तो म्हणाला. त्यावेळी तरुणीने ‘तू माझ्या बापासारखा आहेस. तुझ्या मुली माझ्या एवढ्या आहेत. तुला लाज वाटत नाही का?’ असे विचारले असता त्याने ‘गप्प बसायचं, नाहीतर मी तुला मारून टाकेन’ अशी धमकी दिली. नंतर तिला घेऊन तो खडकवासला धरणाच्या पुढील एका लॉजवर गेला. तेथे तिला मारहाण केली. तिला जबरदस्तीने दारू पाजून लैंगिक अत्याचार केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद केले आहे. रात्री साडेदहाच्या सुमारास तिला त्याने घरी सोडले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने पुन्हा खोलीमध्ये जाऊन तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. घाबरलेल्या मुलीने मामाला फोन केला. मात्र, त्याचा फोन लागला नाही. त्यामुळे तिने मामाच्या मित्राला फोन करून घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर, ती मामाकडे निघून आली. मामाला आणि कुटुंबीयांना सर्व प्रकार सांगितल्यावर सर्वांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. याबाबत पोलीस निरीक्षक (गुन्हे) गीता बागवडे म्हणाल्या की, ही तक्रार प्राप्त होताच स्वारगेट पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून घेत आरोपीला अटक केली. त्याला न्यायालयाने १५ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आमचा पुढील तपास सुरू आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button