क्राईमताज्या बातम्याबीडमहत्वाचेमहाराष्ट्र

बीड ‘आपला शेवटचा दिवस’ असे स्टेटस ठेवणाऱ्याचा पोलिसांनी अवघ्या ५६ मिनिटांत घेतला शोध


बीड : एखादी घटना किंवा गुन्हा घडत असताना कळविले तरी पोलिस वेळेत येत नाहीत. अगदी सिनेमापासून वास्तवातही असे प्रकार नित्याचेच. परंतु, बीड पोलिसांच्या सतर्कतेमुळे एक आत्महत्या टळली आहे.
‘आपला शेवटचा दिवस’ असे स्टेटस ठेवणाऱ्याचा पोलिसांनी अवघ्या ५६ मिनिटांत शोध घेतला. एका शासकीय कर्मचाऱ्याने आर्थिक ओढाताणीतून हा टोकाचा निर्णय घेतला होता. मात्र, एका पोलिस कर्मचाऱ्याच्या हे स्टेटस निदर्शनास आल्याने अनर्थ टळला.



शासकीय कर्मचाऱ्याने बुधवारी (ता.२४) सायंकाळी ६.२८ वाजेच्या सुमारास आपल्या व्हॉट्सॲपला इंग्रजीमध्ये ‘आज माझा आयुष्याचा शेवटचा दिवस आहे’ असे स्टेटस ठेवले. सदर स्टेटस पोलिस कॉन्स्टेबल स्वप्नील गुंड यांनी ६.३९ वाजता पाहिले. ती व्यक्ती आर्थिक विवंचनेत असून ती कोणतेही टोकाचं पाऊल उचलू शकते हे स्वप्नील गुंड यांच्या लक्षात आल्याने त्यांनी या व्यक्तीला फोन लावला. मात्र, त्याचा तो क्रमांक बंद होता.

दुसऱ्या क्रमांकावरही फोन लागत होता परंतु प्रतिसाद दिला जात नव्हता. श्री. गुंड यांनी सर्व पोलिस कर्मचाऱ्यांना सदरील व्यक्तीचा फोटो पाठवून शोध घेण्यास सांगितले. तसेच, डायल ११२ ला शोध घेण्यासाठी माहिती दिली. सायबर सेलच्या फौजदार क्रांती ढाकणे व पोलिस जमादार ए.व्ही. सुरवसे यांनी सदरील व्यक्तीचे लोकेशन मिळवले असता ते कपिलधार ते मांजरसुंभादरम्यान दाखवत होते.

लोकेशनच्या आधारे स्वप्नील गुंड व पोलिस जमादार रोहित शिंदे यांनी दुचाकीवरून धाव घेत प्रथम बिंदुसरा प्रकल्प परिसरात शोध घेतला. पण तिथेही सदर व्यक्ती मिळून आली नाही. त्यानंतर मांजरसुंभा महामार्ग पोलिसांना सदरील व्यक्तीचे फोटो पाठवून मांजरसुभा ते बीडकडे येणाऱ्या रस्त्यावर शोध घेण्यासाठी सांगितले. त्याच्याशी संपर्कादरम्यान ‘मी चाललो’ एवढेच उत्तर देत त्याने फोन कट केला. दरम्यान सदरील व्यक्ती महामार्ग पोलिसांना मांजरसुंभा घाटाजवळ निर्मनुष्य ठिकाणी दिसून आली. त्यास त्यांनी ताब्यात घेऊन आत्महत्या करण्यापासून परावृत्त केले. समजूत काढून घरी सुखरूप आणून सोडले. बीड पोलिस दलाच्या सतर्कतेमुळे अवघ्या ५६ मिनिटांत व्यक्तीचा शोध घेत त्यास आत्महत्या करण्यापासून परावृत्त केल्याने मोठा अनर्थ टळला.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button