विवाहितेवर अत्याचार करणार्‍या माजी सैनिकाला कारावास

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


लातूर:विवाहितेवर अत्याचार केल्याप्रकरणी उदगीर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने एका माजी सैनिकाला सात वर्षांचा कारावास आणि एक लाखाचा दंड, अशी शिक्षा सुनावली आहे. पीडित विवाहिता ही तिच्या शेतात काम करण्यासाठी 2 एप्रिल, 2015 रोजी गेली होती. दरम्यान, आरोपी मल्लिकार्जुन माणिकअप्पा म्हेत्रे याने तिच्यावर अत्याचार केला. याबाबत उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात पीडित विवाहित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास उत्तम हरिश्चंद्र जाधव यांच्याकडे देण्यात आला होता.

त्यांनी या गुन्ह्याचा तपास करून, उदगीर येथील सत्र न्यायालयामध्ये कलम 376, 506 (2) भादंवि अन्वये दोषारोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर, आरोपीने दोष नाकारल्याने या खटल्याची सुनावणी उदगीर येथील सत्र न्यायालयाचे सत्र न्यायाधीश डी. पी. सातवळेकर यांच्या न्यायालयात घेण्यात आली.या खटल्यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने 12 साक्षीदार तपासण्यात आले.

त्यातील पाच साक्षीदार फितूर झाले. पीडित विवाहितेने दिलेली साक्ष आणि इतर आनुषंगिक पुरावे ग्राह्य धरून उदगीर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी. पी. सातवळेकर यांनी आरोपी मल्लिकार्जुन माणिकअप्पा म्हेत्रे याला पीडितेवर अत्याचार केल्याप्रकरणी कलम 376 अन्वये दोषी ठरवत सात वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.

त्याचबरोबर, एक लाख रुपयांचा दंड आणि तो दंड न भरल्यास तीन महिने सश्रम कारावास, अशी शिक्षा सुनावली आहे. त्याचबरोबर, दंडाची संपूर्ण रक्कम ही पीडित विवाहित महिलेला देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या खटल्यात सहायक सरकारी वकील एस. एस.

गिरवलकर यांनी पीडित विवाहितेची बाजू मांडली तर त्यांना न्यायालयीन पैरवीकार पोलिस उपनिरीक्षक जी. पी. मोमीन यांनी सहकार्य केले.