क्राईमताज्या बातम्यामहाराष्ट्र

उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरला मारहाण


रायगड: (आशोक कुंभार )रायगडमधील पेण उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. मनेषकुमार खोलवडीकर यांना रुग्णाकडून पेण पोलिसांच्या समोरच मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी राजू पाटील विरोधात पेण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.आरोपीचा अपघात झाला होता. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याचवेळी त्याने डॉक्टरांना मारहाण केली.

पेण उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. मनेषकुमार खोलवडीकर यांना पेण पोलिसांच्या समोरच रुग्णाकडून मारहाण करण्याची घटना शनिवारी सकाळी घडली. डॉ. मनेषकुमार खोलवडीकर यांना मारहाण करत असताना व नर्स तसेच सुरक्षा रक्षक यांना सदर रुग्ण राजू पाटील याने अर्वाच्च व अरेरावीची भाषा वापरली. दरम्यान, तेथे उपस्थित असलेल्या दहा ते बारा पोलिसांनी मात्र बघ्याची भूमिका घेतली होती. पोलिसांच्या समोर ही घटना घडल्यानं पेण पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न चिन्ह निर्माण केले जात आहेत. दरम्यान, रात्री उशिरा राजू पाटील विरोधात पेण पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला.

रूग्णाने केली डॉक्टरांना मारहाण : मिळालेल्या माहितीनुसार, वरेडी, ता.पेण येथील राजू गोपाळ पाटील ( वय 37) या तरुणाचा तांबडशेत गावातील विहिरी जवळील रस्त्यावर पहाटे मोटारसायकल घसरून अपघात झाला. या अपघातात राजू पाटील याच्या डोळ्याला गंभीर इजा झाली. त्याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याच्या डोळ्यावर डॉ. खोलवडीकर हे प्राथमिक उपचार करण्याच्या तयारीत असताना आरोपी राजू पाटील याने हल्ला केला. खोलवडीकरांना लाथा बुक्क्याने मारहाण करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला.

गुन्हा दाखल : रूग्णाने कर्तव्यावर असलेल्या नर्स व सुरक्षा रक्षक यांना अर्वाच्च व अरेरावीची भाषा वापरली. यावेळी मारहाण होत असताना आरोपीचे नातेवाईक तसेच उपजिल्हा रुग्णालयात उपस्थित असलेल्या पेण पोलीस स्टेशनच्या दहा ते बारा पोलिसांनी देखील कोणताही हस्तक्षेप न करता फक्त बघ्याची भूमिका घेतली. दरम्यान, डॉक्टर, नर्स व उप जिल्हा रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. शासकीय कर्मचाऱ्यांना मारहाण व सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी पेण पोलीस स्थानकात भादंवि कलम 353, 332 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत अधिक तपास पेण पोलीस करत आहेत.

कठोर कारवाईची मागणी : आम्ही दिवस-रात्र रुग्णांना सेवा देत असतो. उप जिल्हा रुग्णालय पेण येथे अनेक प्रकारचे रुग्ण येत असतात. मात्र राजू पाटील या रुग्णाने माझ्यावर केलेला हल्ला व माझ्या कर्मचाऱ्यांना अर्वाच्च भाषेत केलेली दमदाटी ही निंदणीय आहे. हल्ला व दमदाटी करणाऱ्या रुग्ण नातेवाईकांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी डॉक्टरांकडून करण्यात आली.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button