क्राईम

झोपलेल्या पित्याचे तोंड दाबत चाकूने सपासप वार,आईच्या साक्षीने पित्यासह भावाच्या खुन्यास जन्मठेप !


दारूच्या नशेत शेजाऱ्यांशी भांडण करतो, म्हणून वडील आणि मोठ्या भावाने भांडण आवरून लहान भावाला चापट लगावल्या. त्या रागातून नीलेश पाटील याने ओसरीत झोपलेल्या पित्याचे तोंड दाबत चाकूने सपासप वार करत ठार केले.



पित्याला वाचविण्यासाठी आलेल्या मोठ्या भावाच्या पोटात चाकू खुपसून त्याचाही खून केला.

या दुहेरी खुनाच्या घटनेत प्रत्यक्षदर्शी आई सरस्वतीबाईने जशीच्या तशी घटना सांगितली अन्‌ आरोपी नीलेशला जिल्‍हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. जामनेर तालुक्यातील नांद्रा गावात आनंदा कडू पाटील (वय ७०) वास्तव्यास होते. त्यांचा मोठा मुलगा नीलेश ट्रॅव्हल्सवर चालक, तर लहान मुलगा महेंद्र चटई कंपनीत कामाला होता. (Jalgaon Crime Life imprisonment for murder of father brother by mother testimony)

अशी घडली घटना

११ जुलै २०२० ला महेंद्र पत्नीसह आपल्या गावी मुक्कामी होता. त्याच दिवशी रात्री त्याचा मोठा भाऊ नीलेश याने घराजवळ राहणाऱ्या पांडुरंग सोनवणे यांच्यासोबत वाद घातला. या वेळी लहान भाऊ महेंद्र याने मोठ्या भाऊ नीलेशला समजावून घरी आणले. त्यानंतर वडिलकीच्या नात्याने नीलेश याला गावात नेहमी भांडण करतो, म्हणत वडिलांसह लहान भावाने दोन-चार चापटा मारल्या. त्यानंतर नीलेशला एका खोलीत झोपवून आई-वडिल ओसरीत, तर महेंद्र व त्याची पत्नी अश्‍विनी दुसऱ्या खोलीत झोपले होते.

पित्यासह भावाचीही हत्या

रात्री अकराच्या सुमारास नीलेश याने त्याच्या वडिलांचे तोंड दाबून मरेपर्यंत चाकूने भोसकून खून केला. जवळच झोपलेल्या आई सरस्वतीने हे बघत किंचाळ्या मारल्याने लहान मुलगा महेंद्र वडिलांना वाचववियासाठी पळत आला. मात्र, नीलेशने त्याच्याही पोटात चाकू खुपसून ठार मारले. त्याची पत्नी अश्विनी जीव वाचवून पळाल्याने ती थोडक्यात बचावली.

नंतर नीलेश पाटील तसाच हातात चाकू घेत गावात इतरांना धमकावत सुटला. पोलिसपाटील दिनेश कुऱ्हाडे यांना घटना सांगितल्यानंतर त्यांनी खात्री करून पोलिसांना पाचारण केले. महेंद्र व त्याचे वडील आनंदा पाटील यांना पहूर ग्रामीण रुग्णालयात आणल्यावर डॉक्टरांनी मृत घोषित केले. प्रत्यक्षदर्शी मृताची पत्नी अश्‍विनी महेंद्र पाटील यांच्या तक्रारीवरून संशयितावर खुनाचा गुन्हा दाखल झाला व पोलिसांनी नीलेशला अटक केली. (latest marathi news)

 

‘मदर इंडिया’ची साक्ष महत्त्वपूर्ण

एकीकडे पतीचा खून झाल्याने आधार हिरावला. सोबतच लहान मुलाचा खून झाल्याने वृद्धापकाळाची एक काठी मोडली गेली. या सर्वांना जबाबदार मोठा मुलगा नीलेश पश्चतापानंतर वार्धक्याला अधार ठरल शकला असता. साक्ष फिरवली, तर कदाचित तो वाचेल. मात्र, त्याने ज्या निरपराध्यांचा जीव घेतला. त्याची शिक्षा त्याला मिळायलाच हवी, या हेतूने सरस्वतीबाई यांनी घडलेली घटना जशीच्या तशी न्यायालयात मांडली. नीलेश पाटील आरेापीच्या पिंजऱ्यातून हे सर्व ऐकत होता. आई सरस्वतीने न्यायालयात ‘मदर इंडिया’ची भूमिका वठवली.

तेरा साक्षीदारांच्या साक्ष

खटला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.क्यू. एस. एम. शेख यांच्यासमोर खटल्याची सुनावणी झाली. जिल्‍हा सरकारी अभियोक्ता ॲड. सुरेंद्र कबरा यांनी एकूण १३ साक्षीदारांच्या महत्त्वपूर्ण साक्ष नोंदवून घेतल्या. घटनास्थळावरील पुराव्यांसह प्रभावी युक्तिवाद, न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे पिता व भावाचा मारेकरी नीलेश पाटील याला न्यायालयाने दोषी ठरवून जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. पैरवी अधिकारी म्हणून राजेंद्र सैंदाणे यांनी सहकार्य केले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button