जनरल नॉलेज

मलबार हिल परिसरात एक असा बंगला आहे, की जो गेल्या 40 वर्षांपासून बंद आहे.78 वर्षांपूर्वी याच बंगल्यात देशाच्या फाळणीचा कट रचला गेला


मुंबई : मुंबईतला मलबार हिल परिसर सर्वांत आलिशान आणि महागड्या भागांपैकी एक आहे. या भागातली जमीन आणि मालमत्तेला सोन्याइतकंच मूल्य आहे. या भागात गोदरेज कुटुंब, रुईया किंवा जिंदाल यांसारखी श्रीमंत कुटुंबं राहतात.



मलबार हिल परिसरात एक असा बंगला आहे, की जो गेल्या 40 वर्षांपासून बंद आहे.78 वर्षांपूर्वी याच बंगल्यात देशाच्या फाळणीचा कट रचला गेला. ‘साउथ कोर्ट’ असं या बंगल्याचं नाव असून, कधी काळी तो ‘जिना हाउस’ म्हणून प्रसिद्ध होता.

पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना हे या बंगल्याचे मालक होते. परदेशातून शिक्षण घेऊन आल्यावर ते काही दिवस मुंबईत एका छोट्याशा घरात राहत होते. त्यानंतर त्यांनी स्वतः बंगला बांधण्याचा निर्णय घेतला. ‘मनीकंट्रोल’च्या वृत्तानुसार, त्या वेळी जिना यांचं लंडनमध्ये आलिशान घर होतं; पण त्यांनी ते विकलं आणि त्या पैशांतून मुंबईत घर बांधण्याचा निर्णय घेतला.

कसं बांधलं गेलं ‘द जिना हाउस’?

1936मध्ये मोहम्मद अली जिना यांनी हा बंगला बांधला. अडीच एकरात विस्तारलेला हा बंगला युरोपियन शैलीत बांधण्यात आला आहे. ब्रिटन, युरोपसह अनेक पाश्चिमात्य देशांमध्ये जिनांनी प्रवास केला होता. राहण्यासाठी पाश्चिमात्य शैलीतला बंगला बांधवा, असा त्यांचा मानस होता. त्यांनी बंगल्याच्या आरेखनाची जबाबदारी त्या काळचे प्रसिद्ध आर्किटेक्ट क्लाउड बेटली यांच्याकडे सोपवली. ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चरचे अध्यक्षही होते. बेटली यांनी बंगल्याचा नकाशा तयार केल्यावर तो उभारण्याकरिता इटलीवरून कामगार, तसंच इटालियन मार्बल आणि अन्य वस्तू मागवण्यात आल्या. बंगला एकापेक्षा एक आलिशान फिटिंग्ज आणि इतर वस्तूंनी सजवण्यात आला.

बंगला बांधण्यासाठी किती खर्च आला?
मोहम्मद अली जिना यांच्या स्वप्नातलं घर सुमारे दोन लाख रुपयांत बांधून तयार झालं. खरं तर 1936मध्ये ही खूप मोठी रक्कम होती. मनीकंट्रोलच्या वृत्तानुसार, आता या बंगल्याची किंमत एक हजार कोटींहून अधिक असल्याचं सांगण्यात येतं.

 

हेक्टर बोलिथो त्यांच्या ‘जिना : द क्रिएटर ऑफ पाकिस्तान’ या पुस्तकात लिहितात, की मलबार हिल परिसरात बंगला बांधण्यामागे आणखी एक खास कारण होतं. ते म्हणजे, जिना यांचे ग्राहक आणि मित्र दिनशॉ पेटिट यांचा बंगला मलबार हिलजवळ होता. तसंच पेटिट यांची मुलगी रतीशी जिना यांचा विवाह झालेला होता.

जिना हाउसमध्ये रचला गेला भारताच्या फाळणीचा कट

इंग्रजांनी 1945 नंतर जेव्हा भारत सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा जिना हाउसमध्येच मुस्लिम लीगने भारताचं विभाजन करून वेगळ्या देशाची अर्थात पाकिस्तानची रूपरेषा तयार केली होती. जिना हाउस हे भारताच्या विरोधाचं केंद्र बनलं. मोहम्मद अली जिना यांनी या बंगल्यात महात्मा गांधींपासून ते जवाहरलाल नेहरूंपर्यंत अनेक नेत्यांसोबत बैठका घेतल्या. फाळणीनंतर मोहम्मद अली जिना पाकिस्तानात निघून गेले; पण त्यांनी जिना हाउस विकलं नाही. पाकिस्तानात गेल्यावर त्यांनी भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंना अनेक पत्रं लिहून जिना हाउसचा ताबा कोणालाही न देण्याची विनंती केली. मुंबईत आल्यावर या बंगल्यात मुक्काम करता येईल, असा त्यामागे जिनांचा विचार होता; पण जिना परत मुंबईला कधीच येऊ शकले नाहीत; पण त्या वेळी नेहरूंनी त्यांची मागणी मान्य केली आणि बंगला कोणालाही दिला नाही.

वाद कसा सुरू झाला?

फाळणीनंतर मोहम्मद अली जिना यांचा मृत्यू झाला. त्यानंतर जिना हाउसवरून वादाला तोंड फुटलं. भारत सरकारने हा बंगला ब्रिटिश हाय कमिशनकडे सुपुर्द केला. 1981पर्यंत जिना हाउसमध्ये ब्रिटिश हायकमिशनर कार्यालय होतं. त्यानंतर काही दिवसांसाठी हा बंगला इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स या संस्थेला देण्यात आला. त्यानंतर हा बंगला शत्रूची मालमत्ता म्हणून घोषित करत सरकारने तो ताब्यात घेतला. या दरम्यान पाकिस्तानने जिना बंगल्यावर वारंवार आपला हक्क सांगितला. या बंगल्यात पाकिस्तानचा वाणिज्य दूतावास सुरू करता येईल अशी चर्चा होती; पण प्रत्यक्षात तसं झालं नाही.

खटला

मोहम्मद अली जिना यांच्या कन्या दीना वाडिया 2007 साली मुंबई हायकोर्टात गेल्या आणि त्यांनी सांगितलं, की त्या मोहम्मद अली जिना यांच्या एकमेव वारस असल्याने जिना हाउसवर त्यांचा हक्का आहे. दिना वाडिया यांच्या निधनानंतर आता त्यांचे पुत्र नुश्ली वाडिया खटला लढवत आहेत. ते ब्रिटानिया कंपनीचे मालक आहेत.

सरकारचं म्हणणं काय?

याबाबत मुंबई उच्च न्यायालयात परराष्ट्र मंत्रालयाने युक्तिवाद केला की, मोहम्मद अली जिना यांनी त्यांची बहिण फातिमा जिना यांना त्यांच्या मालमत्तेचा एकमेव वारसदार बनवलं होतं. फातिमा जिनाही पाकिस्तानात गेल्या. त्यामुळे जिना हाउसला शत्रूची मालमत्ता म्हणून घोषित करण्यात आलं. कायद्यानुसार आता हा बंगला भारत सरकारच्या ताब्यात आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button