राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देहूमध्ये संत तुकाराम महाराजांच्या मंदिरात येऊन दर्शन घेतलं

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

देहू : (आशोक कुंभार ) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देहूमध्ये संत तुकाराम महाराजांच्या मंदिरात येऊन दर्शन घेतलं आहे. तब्बल 24 वर्षांनंतर शरद पवारांनी तुकाराम महाराज मंदिरात पाऊल ठेवलं आहे.तुकाराम महाराजांच्या मुख्य मंदिरात शरद पवारांनी विठू माऊलीचंही दर्शन घेतलं. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या जीवन कार्यातील प्रसंगचित्रण दिनदर्शिका अनावरण सोहळा शरद पवार यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमाला शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवारही उपस्थित होत्या. शरद पवार यांचा तुकाराम पगडी घालून सत्कार करण्यात आला.

मी देव-दानव यापासून लांब असतो, पण काही देवस्थान अशी आहेत, जी अंत:करणात आहेत, त्यापैकी एक म्हणजे शेगाव. आळंदी देहूत आल्यानंतर मानसिक समाधान मिळतं, असं शरद पवार या कार्यक्रमात म्हणाले. ‘मागच्या 400 वर्षात समाजात बदल घडवण्याचं काम तुकाराम महाराजांनी केलं आहे. 400 वर्ष तुकाराम महाराजांनी समाजाला योग्य दिशा दिली, त्यामुळे इतर कोणाचं नाव घ्यायचं काही कारण नाही.

मोरे घराणं हे मूळ घराणं आहे, त्यांनी सुचवलं की संताच्या जीवनावर आधारित दूरचित्रवाणी दाखवा. येत्या आठवड्यात यासंदर्भात चर्चा करण्यासाठी मी त्यांना बोलावलं आहे. दूरचित्रवाणीद्वारे इतिहास पोहोचवण्याची पावलं उचलूयात,’ अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली

‘वारीला गेलो नाही, पण…’ काही वर्षांपूर्वी एका जाहीर कार्यक्रमात शरद पवार यांनी आपण वारी केली नाही, पण त्याचा अनादरही केला नसल्याचं विधान केलं होतं.

कधी पंढरपूरला गेलो तर जास्त जणांना बरोबर न घेता गुपचूप पांडुरंगाचं दर्शन घेतो. मुख्यमंत्री असताना कधीही शासकीय महापूजा चुकवली नाही, असं शरद पवार म्हणाले होते. ‘मी वारीपासून लांब असतो असं बोललं जातं, पण मला कोणत्याच गोष्टीचं अवडंबर केलेलं आवडत नाही. कधी पंढरपूरजवळ गेलो तर फार लोकांना बरोबर घेऊन न जाता गुपचूप पांडुरंगाचं दर्शन घेतो. याचे फोटो प्रसिद्ध व्हावेत, अशी माझी इच्छा नसते. राज्याची जबाबदारी माझ्यावर होती तेव्हा कधीही शासकीय पूजा चुकवली नाही,’ असं एका कार्यक्रमात शरद पवारांनी सांगितलं होतं.