महाराष्ट्रराजकीय

कोल्हापुरात शाहू महाराजांची ताकद वाढली, एमआयएमचा पाठिंबा – इम्तियाज जलील


लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर मतदारसंघात मोठी लढत पाहायला मिळणार आहे. कोल्हापूरचे विद्यमान खासदार आणि शिवसेनेचे (शिंदे गट उमेदवार संजय मंडलिक यांना छत्रपती शाहू महाराज द्वितीय यांनी आव्हान दिलं आहे.



शाहू महाराज काँग्रेसच्या तिकीटावर कोल्हापूरमधून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. दोन तुल्यबळ उमेदवारांमधील ही लढत रंगतदार होणार आहे. दरम्यान, कोल्हापुरात शाहू महाराजांची ताकद वाढली आहे. कारण या मतदारसंघात महाविकास आघाडीतले सर्व पक्ष शाहू महाराजांबरोबर आहेतच. त्यांच्याबरोबर इतर लहान मोठे पक्षदेखील (जे महायुतीत नाहीत) शाहू महाराजांबरोबर आहेत. अशातच एका मोठ्या पक्षाने शाहू महाराजांना पाठींबा दर्शवला आहे. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाने शाहू महाराजांना पाठिंबा जाहीर केला आहे.

एआयएमआयएम पक्षाचे छत्रपती संभाजीनगरचे (औरंगाबाद) खासदार इम्तियाज जलील यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेऊन शाहू महाराजांना पाठिंबा जाहीर केला आहे. जलील यांनी छ. संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी खासदार जलील म्हणाले, शाहू महाराज किंवा मविआने आमच्याकडे पाठिंब्याची मागणी केली नव्हती. मात्र आम्ही स्वतःहून या निवडणुकीत त्यांच्या बाजूने उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.

इम्तियाज जलील म्हणाले, आम्ही (महाराष्ट्र एमआयएम) एक निर्णय घेतला आहे, या निर्णयाबाबत आम्ही आमच्या पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्याशीदेखील चर्चा केली आहे. आम्ही कोल्हापूरचे मविआचे उमेदवार शाहू महाराज यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व राजकीय पक्षांमध्ये केवळ वाईटच लोक असतात असं काही नसतं. आमच्या विरोधात असणाऱ्या पक्षांच्या बाबतीतही हे तितकंच मोठं सत्य आहे. त्यामुळे मी आमच्या कोल्हापूरमधील एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं आहे की तुम्ही शाहू महाराजांचं समर्थन करा. शाहू महाराजांनी मला फोन केला नाही किंवा समर्थन मागितलेलं नाही. आम्ही स्वतःहून त्यांच्याबरोबर उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.

खासदार जलील म्हणाले, अनेक राजकीय पक्ष छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने राजकारण करत आहेत. त्यांच्याविरोधात उमेदवार उभे करत आहेत. शाहू महाराज कोण आहेत, त्यांचं कोल्हापुरात काय स्थान आहे याची विरोधकांना कल्पना नसावी. आम्ही स्वतःहून त्यांना पाठिंबा द्यायचं ठरवलं आहे. याबाबत मी असदुद्दीन ओवैसी यांनादेखील सांगितलं आहे. मी त्यांना म्हटलं की, अनेक चांगले खासदारही आम्ही पाहिले आहेत. त्यांना आपण मदत करण्याची आवश्यकता आहे. म्हणून आम्ही कोल्हापूरच्या शाहू महाराजांना पाठिंबा देत आहोत. आम्हाला कोणी पाठिंबा मागितलेला नाही, आम्ही स्वतःहून त्यांना समर्थन देत आहोत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button