लग्नानंतर दोन महिन्यांनी प्रेयसी भेटायला आली, त्याने आधी तिला संपवलं नंतर स्वतःही.

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


सातारा : ही कहाणी आहे स्नेहन आणि दत्तात्रय यांची. दोघांचीही घरं जवळ होती. त्यांच्यात जवळीकता निर्माण झाली. त्यांनी एकत्र राहण्याचं ठरवलंसुद्धा. पण, अडचण आली ती घरच्यांची.
स्नेहलच्या कुटुंबीयांना हा मुलगा पसंत नव्हता. त्यामुळं त्यांनी तिचे दुसरीकडे लग्न लावून दिले. पण, ती समाधानी नव्हती. दोन महिन्यांनी माहेर परतली. तेव्हा ती दत्तात्रयला भेटायला गेली. दत्तात्रयच्या मनात तू माझी का होऊ शकली नाही, याचा राग होता. म्हणून त्याने अतिशय टोकाचा निर्णय घेतला. स्नेहलला घरी बोलवल्यानंतर तिच्यावर वार केले. ती गतप्राण झाली. त्यानंतर त्यानेही स्वतःला गळफास लावून संपवलं. दुसऱ्या दिवशी म्हणजे आज सकाळी दोघांचेही मृतदेहच सापडले. या थरारक घटनेने सातारा जिल्ह्यातलं वांझोळी गाव हादरलं.

दोन महिन्यांपूर्वी झाला विवाह

सातारा जिल्ह्यात माण तालुक्यातील वांझोळी या गावात धक्कादायक घटना घडली आहे. प्रेम प्रकरणातून एका प्रेमवीराने नवविवाहितेचा खून करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. स्नेहल वैभव माळी असे खून झालेल्या नवविवाहितेचे नाव आहे. तर दत्तात्रय सुरेश माळी असे गळफास घेतलेल्या प्रेमवीराचे नाव आहे. रात्री उशिरा ही घटना घडली. याची माहिती औंध आणि पुसेसावळी पोलिसांना समजली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांचे मृतदेह एका घरात आढळून आले आहेत. माण तालुक्यातील वांझोळी येथील दत्तात्रय माळी आणि स्नेहल यांचे एकमेकांवर प्रेम होते. मात्र घरातील मंडळींनी दोन महिन्यापूर्वी स्नेहल यांचा विवाह लावून दिला होता.

काल रात्री काय घडलं?

स्नेहल ही दोन महिन्यांनंतर माहेरी वांझोळीत आली होती. दत्तात्रय माळी यांचे घर स्नेहल यांच्या घराच्या काही अंतरावरच होते. काल संध्याकाळच्या सुमारास दत्तात्रय माळी यांनी स्नेहल यांना आपल्या घरी बोलावले होते. यावेळी घरात कोणी नसल्याचा फायदा घेत दत्तात्रय माळी याने स्नेहल हिच्यावर शस्त्राने वार केले. यामध्ये स्नेहलचा जागीच मृत्यू झाला. यानंतर दत्तात्रेय माळी यांनी त्याच घरात स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. यानंतर औंध आणि पुसेसावळी पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात हलवलेत. या घटनेची नोंद रात्री उशिरा औंध पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.