ताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्र

गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीलाही मिळणार १०० रूपयांत ‘आनंदाचा शिधा’


दिवाळीनंतर आता गुढीपाडवा आणि आंबेडकर जयंतीनिमित्त देखील १०० रूपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय आज (दि.२२) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला आहे. याचा राज्यातील १ लाख ६३ हजार शिधा पत्रिकाधारकांना लाभ मिळणार आहे.अंत्योदय आणि केशरी कार्डधारकांना ‘आनंदाचा शिधा’ देऊन त्यांची दिवाळी आणखी गोड करण्याचा प्रयत्न राज्यसरकारने केला होता. यासाठी रेशन दुकानांतून शंभर रुपयांत रवा, साखर, तेल, चणाडाळीचे किट दिले होते. त्यानंतर आता आणखी एक निर्णय आज सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या राज्यमंत्रिमंडळ बैठकीत घेतला आहे. गुढीपाडवा तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधा पत्रिकाधारकांना १०० रूपयांत ‘आनंदाचा शिधा’ देण्यात येणार आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील केशरी शेतकरी शिधा पत्रिकाधारकांना १ किलो रवा, १ किलो चनाडाळ, १ किलो साखर आणि १ लिटर पामतेल असा आनंदाचा शिधा गुढी पाडव्यापासून पुढील १ महिन्याच्या कालावधीसाठी ई-पॉसद्धारे १०० रुपये प्रतिसंच असा सवलतीच्या दरात दिला जाईल. ई-पॉसची व्यवस्था नसलेल्या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने हा शिधा दिला जाणार आहे.

हा आनंदाचा शिधा देण्याकरिता आवश्यक शिधा जिन्नसांची खरेदी करण्याकरिता महाटेंडर्स या ऑनलाईन पोर्टलद्धारे २१ दिवसांऐवजी १५ दिवसांच्या कालावधीत निविदा प्रक्रिया राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. २०२२ मध्ये दिवाळी सणानिमित्त शिधाजिन्नस खरेदीसाठी पार पडलेल्या निविदा प्रक्रियेत २७९ प्रति संच या दरानुसार ४५५ कोटी ९४ लाख आणि इतर अनुषंगीक खर्चासाठी १७ कोटी ६४ लाख अशा ४७३ कोटी ५८ लाख इतक्या खर्चास देखील मान्यता देण्यात आली.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button