नराधम बापाने मुलीसोबत अश्लील वर्तन,नंतर बापाची गळफास घेऊन आत्महत्या..

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


सिंहगड रस्त्याला लागून असलेल्या नांदेड फाट्याजवळील पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाहिनी लगत बाभळीच्या झाडाला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह आज आढळून आला.

हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार , पोलीस हवालदार अशोक तारु व इतर कर्मचारी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव बंडू लक्ष्मण ढवळे (वय 43, रा. वाल्हेकर वस्ती, जिल्हा परिषद शाळेजवळ नांदेडगाव ता. हवेली जि. पुणे.) असल्याचे निष्पन्न झाले. पोलीसांनी अधिक तपास केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे.

5 फेब्रुवारी रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास एकोणीस वर्षांची मुलगी घरात एकटी असताना बाप बंडू ढवळे हा दारुच्या नशेत घरी आला.”तुला पोलीस भरती करायचेय, काय येईल तेवढा खर्च मी करणार आहे, मला तु खुप आवडतेस,” असं म्हणत नराधम बापाने मुलीसोबत अश्लील वर्तन सुरू केले. घाबरलेली मुलगी घराबाहेर पळाली व तिने कामाला गेलेल्या आईला रडतरडत घडलेला प्रसंग सांगितला.

मुलीची आई कामावरुन घरी आली व मुलीला घेऊन थेट हवेली पोलीस ठाण्यात गेली. मुलीच्या तक्रारीवरून नराधम बापाच्या विरोधात गुन्हा दाखल करुन माय-लेकी आपल्या मुळ गावी निघून गेल्या. तेव्हापासून हवेली पोलीस आरोपी वासनांध बापाचा शोध घेत होते.

आज सकाळी नांदेड फाट्याजवळ एका बाभळीच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेतील बंडू ढवळे याचा मृतदेह आढळून आल्यानंतर यामागील धक्कादायक घटनाक्रम समोर आला आहे. पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अजय पाटसकर व पोलीस हवालदार अशोक तारु याबाबत अधिक तपास करत आहेत.