ताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्र

सोलापूर पोलिसांनी बनविली १०४३ गुन्हेगारांची यादी; निवडणुकीपूर्वी काहीजण होणार तडीपार व स्थानबद्ध


सोलापूर : येत्या काही महिन्यात सोलापूर महापालिकेची निवडणूक होईल, अशी शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, शहरातील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था भंग करण्याबरोबरच खुनाचे गुन्हे केलेल्या संबंधित गुन्हेगारांची पोलिस ठाणेनिहाय यादी पोलिस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपायुक्त विजय कबाडे यांनी तयार केली आहे. त्यामध्ये तब्बल एक हजार ४३ जणांचा समावेश आहे.



सोलापूर शहरात एकूण सात पोलिस ठाणी असून त्याअंतर्गत जवळपास तीन हजारांपर्यंत पोलिसांचे मनुष्यबळ आहे. शहराचा विस्तार, लोकसंख्येचा विचार करता तेवढे पोलिसांचे मनुष्यबळ अपुरेच आहे. त्यात पुन्हा पोलिसांना वर्षातील ३६५ पैकी २१० दिवस बाहेरील बंदोबस्ताची ड्यूटी.

अशातून पोलिस अंमलदार गुन्हेगारी कमी करण्याचा प्रयत्न करतात. परंतु, विजापूर नाका, सदर बझार, एमआयडीसी व फौजदार चावडी या पोलिस ठाण्याअंतर्गत सर्वाधिक गुन्हेगार असल्याचे पोलिसांकडील गुन्हेगारी माहितीच्या यादीवरून स्पष्ट होते. दरम्यान, गंभीर गुन्ह्यातील आरोपींवर पोलिस आयुक्त, पोलिस उपायुक्त, सहायक पोलिस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक कारवाई केली जाते. सुधारण्याची संधी देऊनही संबंधितांच्या वर्तनात सुधारणा न झालेल्या सराईत गुन्हेगारांवर पोलिस आयुक्तांकडून स्थानबद्धतेची (एमपीडीए) कारवाई केली जाते.

पोलिस उपायुक्तांच्या माध्यमातून वेगवेगळ्या गुन्ह्यातील आरोपींवर तडीपारीची कारवाई केली जाते. सण-उत्सव, निवडणुकीच्या अनुषंगाने, सहायक पोलिस आयुक्तांच्या माध्यमातून सराईत गुन्हेगारांना १०७, ११०, १४४ कलमांतर्गत नोटीस बजावली जाते. तर पोलिस ठाण्यांकडून कलम १४९ अंतर्गत नोटीस देऊन आरोपींविरूद्ध कारवाई केली जाते. पुढील काळात निवडणुका असल्याने संबंधितांवर एमपीडीए व तडीपारीची कारवाई केली जाणार असून त्याअनुषंगाने अधिकाऱ्यांनी काही आरोपींचे प्रस्ताव तयार केले आहेत.

सराईत गुन्हेगारांवर होणार कठोर कारवाई

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, शहरातील सराईत गुन्हेगारांसह ज्यांच्यावर शरीराविरूद्धचे गुन्हे व सार्वजनिक ठिकाणी जमाव जमवून शांतता भंग केल्याचे किमान दोन गुन्हे असलेल्यांची यादी तयार केली आहे. निवडणुकीपूर्वी त्यातील काहींवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे. खबरदार..! आता गुन्हा केला की कारवाई अटळ

दोन गटात हाणामारी, चोरी, घरफोडी, खून, खुनाचा प्रयत्न, सार्वजनिक ठिकाणी जमाव जमवून दहशत निर्माण करणे, अवैध व्यवसाय करणे अशा विविध प्रकारच्या जवळपास पाच ते सहा हजार गुन्हेगारांची यादी पोलिसांकडे आहे. पण, त्यातील खुनाचा प्रयत्न, सार्वजनिक ठिकाणी जमाव जमवून शांतता व सुव्यवस्था भंग करण्याचा प्रयत्न केलेल्या एक हजार ४३ जणांवर पोलिसांचा विशेष वॉच असणार आहे. त्यातील संशयितांनी आता एकजरी गुन्हा केला तर, त्यांच्यावर निश्चितपणे तडीपारीची किंवा स्थानबद्धतेची कारवाई होऊ शकते, असा इशारा पोलिस उपायुक्त विजय कबाडे यांनी दिला आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button