सोनापूर परिसरातील खडकवासला धरणात पोहताना पुण्यातील दोन महाविद्यालयीन युवकांचा बुडून मृत्यू झाला. ही दुर्घटना सोमवारी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली.फरहान अलिम शेख (वय 18, रा. शिवतीर्थनगर, कोथरूड) व साहिल विलास ठाकर (वय 19, रा. शास्रीनगर, कोथरूड) अशी मृत्यू झालेल्या युवकांची नावे आहेत.
फरहान व साहिल हे मित्र रितेश औटी, अपूर्व घोलप, यज्ञेश रावडे यांच्यासह फिरण्यासाठी खडकवासला धरण तीरावर आले होते. त्या वेळी फरहान व साहिल हे पोहण्यासाठी पाण्यात उतरले. मात्र, दोघांनाही पोहता येत नसल्याने व पाण्याचा अंदाज न आल्याने ते धरणात बुडू लागले.
त्यामुळे परिसरातील पर्यटकांनी आरडाओरड केला. स्थानिक कार्यकर्ते गोरक्ष पवळे यांनी याबाबत हवेली पोलिस व मच्छीमारांना माहिती दिली. मच्छीमार होडी घेऊन घटनास्थळी दाखल झाले. तसेच पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार, सहायक पोलिस निरीक्षक नितीन नम, पोलिस नाईक संतोष भापकर आदीही त्या ठिकाणी आले. त्यानंतर मच्छीमार, स्थानिक नागरिकांनी दोन्ही युवकांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले.