जन्मदात्या आईनेच पोटच्या १६ वर्षीय मुलीचा शारीरिक संबंध ठेवण्यासाठी 1000 रुपयात केला सौदा

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

मुंबई : जन्मदात्या आईनेच पोटच्या १६ वर्षीय मुलीचा तिच्या वयापेक्षा तिप्पट वयाच्या व्यक्तीसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी सौदा केल्याची मायलेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना अंधेरीमध्ये समोर आली आहे.
दीड वर्षांपासून सुरू असलेल्या अत्याचाराला मुलीनेच वाचा फोडली असून डी.एन.नगर पोलिसांनी मुलीच्या ४० वर्षीय आईसह अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे.

अंधेरी परिसरात राहणाऱ्या १६ वर्षीय मुलगी आईसोबत राहायची. वडिलांच्या अकाली निधनानंतर या दोघींना एकमेकींचाच आधार होता. लहानपणीच सुरुवातीला आईने घरकामात जुंपले. पुढे, आईने जून २०२१ पासून जनता फ्लोअर मिलमध्ये कामासाठी पाठवले. मात्र, तेथे कामाऐवजी फ्लोअर मिलचा चक्कीवाला तिला एका खोलीत नेत तिच्यावर अत्याचार करू लागला. मुलीने त्याला विरोध केला; पण ती त्याच्यापुढे असह्य होती.

तो तिला मारहाण करून अत्याचार करत होता आणि प्रत्येकवेळी हजार रुपये देत होता. मुलीने याबाबत आईलाही सांगितले. मात्र, तिने देखील ‘तुझे ते काम आहे ते करायचे’, असे सांगून तिच्यावर दबाव आणला. गेल्या वर्षी नोव्हेंबरपर्यंत मुलीवर अत्याचार सुरू होते. वासनाधीन व्यक्तीच्या विकृतीला कंटाळून अखेर मुलीने पोलिसांत धाव घेतली. मुलीच्या अत्याचाराची कहाणी ऐकून पोलिसांनाही धक्का बसला.

मुलगी मानसिक धक्क्यात

या घटनेमुळे मुलगी मानसिक धक्क्यात असून पोलिसांकडून तिच्यावर समुपदेशन करण्यात येत आहे. तसेच, अन्य कुठल्या व्यक्तीसोबतही तिला शारीरिक संबंधासाठी दबाव आणला होता का? याबाबतही पोलिस चौकशी करत आहे.

पोलिसांनी तत्काळ ४० वर्षीय आईसह अत्याचार करणाऱ्या चक्कीवालाविरोधात गुन्हा नोंदवला आहे. या गुन्ह्यात दोघांनाही अटक करण्यात आली आहे.