शेत-शिवार

ब्राझीलमध्ये विनाशकारी महापूर, हजारो घरे पाण्याखाली; आतापर्यंत ५७ जणांचा मृत्यू


ब्राझीलमध्ये मुसळधार पावसाने चांगलंच थैमान घातलं आहे. अतिवृष्टीमुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे अनेक भागातील रस्ते आणि पूल उद्ध्वस्त झाले आहेत.



घरांमध्ये पाणी शिरल्याने हजारो लोक बेघर झाले आहेत. या विनाशकारी महापुरात आतापर्यंत ५७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

पुरामुळे अनेक भागातील रस्ते आणि पूल उद्ध्वस्त झाले. एएनआयने अल जझीराचा हवाल्याने हे वृत्त दिलं आहे. एएनआयच्या माहितीनुसार, सध्या बचाव आणि मदत कार्य सातत्याने सुरू आहे. घरे, रस्ते आणि पुलांच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना शोधण्यासाठी बचाव पथक सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.

 

रिओ ग्रांदे दो सुलमध्ये पाण्याची पातळी जास्त असल्याने धरणांवरचा भार वाढत असल्याचेही वृत्त आहे. त्यामुळे काही शहरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पूरस्थिती पाहता गव्हर्नर एडुआर्डो लीट यांनी परिसरात आणीबाणी जाहीर केली आहे. “आम्ही आमच्या इतिहासात पाहिलेल्या सर्वात वाईट शोकांतिकेचा सामना करत आहोत,” असं त्यांनी म्हटलं आहे.

मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली. दुसरीकडे, राष्ट्राध्यक्ष लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा यांनी प्रभावित भागात पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. तेथे मानवी आणि भौतिक साधनांची कमतरता भासणार नाही, असे ते म्हणाले.

येत्या काही तासांत रिओ ग्रांदे डो सुलची राजधानी पोर्टो अलेग्रे शहराला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानतळाने सर्व उड्डाणे अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहेत. अतिवृष्टीमुळे राज्याची मुख्य नदी, गयाबा, धोक्याची पातळी गाठण्याची शक्यता आहे. त्यामुळे बचावपथकाला अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button