ताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्र

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची शपथ घेतली होती, त्याप्रमाणं 10 टक्के आरक्षण दिलं – एकनाथ शिंदे


मराठा समाजाला आरक्षण (Maratha Community Reservation) मिळवून देण्याची शपथ घेतली होती. त्याप्रमाणे दहा टक्के आरक्षण दिले आहे; पण काही जण हे आरक्षण टिकणार नाही, असे सांगत आहेत.



त्यांना संधी मिळाली होती; पण त्यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविला नाही. आता सर्वोच्च न्यायालयाकडून आलेल्या त्रुटी काढल्या असून, हे आरक्षण कायद्याच्या चौकटीत टिकणार आहे. त्यामुळे मराठा समाजाने आंदोलन न करता संयम राखावा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केले.

दरम्यान, लोकसभेच्या जागा वाटपाच्या महायुतीच्या (Mahayuti) बैठका सुरू आहेत. त्यामुळे उदयनराजे यांना माझ्या शुभेच्छा आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री शिंदे यांनी काल जलमंदिर पॅलेस येथे जाऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ”दसरा मेळाव्यात छत्रपतींसमोर नतमस्तक होऊन आम्ही कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण देण्याची शपथ घेतली होती. त्यानुसार आम्ही विशेष अधिवेशन घेऊन आरक्षण दिले आहे. मराठा समाजाला दिलेले आरक्षण टिकणार नाही, असे काहीजण म्हणत आहेत; पण ते कसे टिकणार नाही, हे ते सांगत नाहीत. ज्यावेळी त्यांच्या हातात सत्ता होती, त्यावेळी त्यांनी संधीचे सोने केले नाही. आता आम्ही सर्व्हे करून मराठा समाजाचे मागासत्व सिद्ध केले आहे. त्यामुळे उदयनराजेंच्या समोर सांगतो. मराठा समाजाने लढा दिला तो यशस्वी झाला आहे.”

मनोज जरांगे आंदोलनाबाबत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ”मराठा समाजाला मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्र मिळत नव्हते, ते शोधले. शिंत्रे समिती तेलंगण, हैदराबादमध्ये काम करत आहे. मराठा समाजाला ओबीसी समाजाप्रमाणे सवलती देण्याचा निर्णय घेतला. उर्वरित लोकांना दहा टक्के आरक्षण दिले आहे. त्यातून त्यांना शिक्षण, नोकरीत न्याय मिळेल. त्यामुळे मराठा समाजाने संयम राखावा. सरकार सकारात्मक आहे व देणारे आहे.”

उदयनराजेंचा वाढदिवस असून, त्यांनी लोकसभेची निवडणूक लढावी, अशी जिल्ह्यातील शिवभक्तांची भूमिका आहे, यावर आपले मत काय आहे? या प्रश्नावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ”सध्या महायुतीच्या बैठका सुरू आहेत. जागा वाटपाच्या बैठका सुरू आहेत. त्यामुळे उदयनराजेंना माझ्या शुभेच्छा आहेत.” मी सगळंच इथं सांगू शकत नाही, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button