ताज्या बातम्या

लोकसभेसाठी महायुती सावध; महाआघाडीच्या जोरबैठका, शिवसेनेच्या दोन्ही गटात ‘सामना’ शक्य


राजाराम लोंढेकोल्हापूर : कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीचे उमेदवार जवळपास निश्चित आहेत. मात्र, विविध खासगी संस्थांकडून येणारे सर्व्हे पाहता भाजपने सावध हालचाली सुरू केल्या आहेत.तर महाविकास आघाडीच्या इच्छुकांनी जोरबैठका मारण्यास सुरुवात केली आहे. सर्वच पक्षातील अंतर्गत हालचाली पाहता, कोल्हापूरमध्ये शिवसेनेच्या दोन्ही गटातच ‘सामना’ रंगण्याची दाट शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर महायुतीला एकतर्फी लढाई वाटत असली तरी सध्याचा अंंडर करंट पाहता निकराची झुंज पहावयास मिळणार हे निश्चित आहे.



 

भाजपने महाराष्ट्रात लोकसभेच्या ४५ जागा जिंकायच्याच या इराद्याने काम सुरु केले. त्यातूनच शिवसेना व राष्ट्रवादी कॉग्रेसमधील मातब्बरांना सोबत घेऊन महाविकास आघाडीचे गणीत बिघडवून टाकले आहे. कोल्हापूर जिल्हा हा कॉग्रेस, राष्ट्रवादी कॉग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र, मागील निवडणूकीपासून जिल्ह्यातील राजकीय गणीत बदलली आहेत.

 

गेल्या वेळेला ‘कोल्हापूर’मधून शिवसेनेचे संजय मंडलीक तर ‘हातकणंगले’तून धैर्यशील माने हे विजयी झाले. गेल्या पाच वर्षात अनेक स्थित्यांतरे झाली आहेत, शिवसेना फुटीनंतर दोघांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साथ दिली. गेली वर्षभर महाविकास आघाडी व युतीमध्ये सरळ सामना होईल, असे वाटत असताना राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये फुट पडल्याने महायुतीची ताकद वाढली आहे.

 

महायुतीकडून विद्यमान खासदारांना संधी मिळण्याची शक्यता आहे. दोनपैकी एक जागा घेण्याच्या हालचाली भाजपांतर्गत सुरू आहेत. मग, यातीलच एकाला ‘कमळ’ चिन्हावर लढवायची की इतर पर्याय द्यायचा, याची चाचपणीही सुरू आहे. सध्या तरी महायुतीमध्ये शिवसेनेला ही जागा सोडली जाणार असेच चित्र आहे.

 

महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध असताना त्यांनी ‘कोल्हापूर’च्या जागेवर दावा केला होता. आता फुटीनंतरही त्यांनी दावा सोडलेला नाही. पण, ही जागा आपली असल्याने आम्हाला सोडावी, असा प्रयत्न शिवसेनेचा आहे. तर, सहापैकी तीन विधानसभेचे, तर दोन विधानपरिषदेचे आमदार असल्याने ताकद अधिक असल्याचा दावा काँग्रेसचा आहे.

 

महायुतीच्या पातळीवर वरिष्ठ पातळीवर जोडण्या लावल्या जात असल्या तरी स्थानिक पातळीवर अद्याप शांतता दिसत आहे. काँग्रेसकडून राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे यांनी मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. तर महाविकास आघाडीकडून डॉ. चेतन नरके यांनी गाव टू गाव संपर्क माेहीम राबवत वातावरणनिर्मिती केली आहे.

 

एकंदरीत ‘मातोश्री’वरील हालचाली पाहता, ‘कोल्हापूर’मध्ये शिवसेना (शिंदे गट) व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यातच ‘सामना’ होण्याची दाट शक्यता आहे.

 

अशी आहे उमेदवारांची चर्चा :

 

कोल्हापूर –

महायुती : संजय मंडलिक, धनंजय महाडिक

महाविकास आघाडी : डॉ. चेतन नरके, बाजीराव खाडे, संजय घाटगे, विजय देवणे

 

हातकणंगले –

महायुती : धैर्यशील माने

महाविकास आघाडी – मुरलीधर जाधव, राजू शेट्टी


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button