ताज्या बातम्या

एसटी’चा आरसा! स्वारगेट, शिवाजीनगर स्थानके काठावर पास; पुणे स्थानक अनुत्तीर्ण


पुणे : एसटी स्थानक म्हटले की सगळीकडे अस्वच्छता, स्वच्छतागृहांची दुरवस्था, दुर्गंधी, मोडलेल्या खुर्च्या आणि रया गेलेली इमारत असे चित्र सर्वसाधारणपणे दिसते. हे चित्र बदलण्यासाठी स्वच्छ व सुंदर एसटी बस स्थानकांचे अभियान राबविण्यात येत आहे.त्याअंतर्गत झालेल्या सर्वेक्षणात पुण्यातील प्रमुख स्थानकांपैकी स्वारगेट आणि शिवाजीनगर (वाकडेवाडी) काठावर उत्तीर्ण झाली असून, पुणे स्थानक अनुत्तीर्ण ठरले आहे.



महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाचीही वाहतूक स्वच्छ आणि सुंदर वातावरणात व्हावी, अशी सूचना एसटी महामंडळाचे अध्यक्ष व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. त्यानुसार एसटी महामंडळाने राज्यातील ५७७ एसटी बसस्थानके स्वच्छ, सुंदर बनवण्यासाठी पाऊल उचलले. यासाठी बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान सुरू केले. यात राज्यातील सर्व बसस्थानकांचे मे आणि जून महिन्यातील कामगिरीचे मूल्यमापन जुलैमध्ये करण्यात आले. दर दोन महिन्यांनी हे मूल्यमापन करून अंतिम गुण निश्चित करून विजेती स्थानके ठरविली जाणार आहेत.

यात पुणे विभागातील ४२ स्थानकांचे सर्वेक्षण करून त्यांचे मूल्यमापन करण्यात आले. पुण्यातील प्रमुख स्थानकांपैकी स्वारगेटला ५९ गुण, शिवाजीनगरला ५२ गुण आणि पुणे स्थानकाला ४० गुण मिळाले. हे गुण १०० पैकी असून, ५० गुणांच्या पुढे स्थानके उत्तीर्ण असल्याचे गृहित धरले जाते. म्हणजेच स्वारगेट आणि शिवाजीनगर ही स्थानके काठावर उत्तीर्ण झाली असून, पुणे रेल्वे स्थानक अनुत्तीर्ण ठरले आहे. पुणे विभागात नारायणगाव स्थानक ७४ गुणांसह प्रथम स्थानी आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button