लोखंडी फायटरने तरुणाला बेदम मारहाण; तीन जणांवर गुन्हा दाखल
शिरूर: एका तरुणाला जुने भांडण मिटवण्याच्या बहाण्याने शिरुर येथे बोलावून तीन जणांनी लाथा, बुक्यांनी तसेच हातातील लोखंडी फायटरने बेदम मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शिरुर पोलीस स्टेशनमध्ये तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.साईराज वाबळे, सिदार्थ शिंदे, निखील वाबळे सर्वजण (रा. म्हसने ता. पारनेर जि. अहमदनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी (दि.२४ जुलै) दुपारी फिर्यादी अनिकेत दिलीप पठारे (वय २१ रा. वाडेगव्हाण ता. पारनेर जि. अहमदनगर) या तरुणाला आरोपींनी जुने भांडण मिटवायचे आहे असे सांगून बोलावून घेतले. ब्रेजा कारने (एमएच १६ सीक्यू ८३३१) आलेल्या तिघांनी पठारे या तरुणाला लाथा, बुक्यांनी व हातातील लोखंडी फायटरने उजव्या कानाच्या शेजारी मारहाण केली. तसेच शिवीगाळ व दमदाटी करुन जीवे मारण्याची धमकी दिली.
सदरील घटना शिरूर येथील रेव्हेन्यू कॉलनी येथे घडली असून पठारे याच्या तक्रारीवरून शिरुर पोलीस स्टेशनमध्ये तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक शिंदे करत आहेत.