ताज्या बातम्यामहाराष्ट्र

हवामान बदलानुसार पीक लागवड करा’


अकोला: शेती व्यवसाय किंवा पिकांची व्यवस्थित वाढ आणि कमी खर्चात अधिक उत्पादन मिळविण्यासाठी पर्यावरण समृद्धी चांगली असणे हे अत्यंत आवश्यक आहे, ही बाब आता प्रकर्षाने जाणवू लागली आहे.
त्यासाठी गावोगावी पर्यावरणाचे रक्षण करणे हे शेती क्षेत्रासाठी व सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट बनली आहे.



त्याच अनुषंगाने बाळापूर तालुका कृषी अधिकारी व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या वतीने मौजे-कळंबा बु. येथे पर्यावरणपूरक जीवन पद्धती अभियानांतर्गत ‘किसान गोष्टी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून सरपंच गोपाल उगले, तालुका कृषी अधिकारी नंदकुमार माने, पंदेकृविचे शास्त्रज्ञ डॉ. गजानन लांडे, कृषी विज्ञान केंद्राचे कुलदीप देशमुख, विषयज्ञ विशाल उमाळे, मंडळ कृषी अधिकारी शिवाजी जाधव, ‘आत्मा’चे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक व्ही. एम. शेगोकार, कृषी सहायक विजय भवरे, डॉ. सुरेश पाटील, शंभू भरणे, धनंजय नेमाडे, पवन इधोळ, अविनाश ताथोड यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

शेती व्यवसाय बंधनमुक्त करावा
मार्गदर्शन करताना नंदकुमार माने यांनी एकपीक पद्धतीऐवजी बहुपीक पद्धतीचा अवलंब करावा. एका हंगामात उपलब्ध क्षेत्रावर एकाच पिकाची लागवड करण्याऐवजी विविध पिकांचे नियोजन करून लागवड केल्यास जोखीम कमी होण्यास मदत होते.

पूर्ण क्षेत्रावर कापूस किंवा सोयाबीन घेण्याऐवजी काही क्षेत्रात कडधान्य, ज्वारी, चारापिके तसेच फळपिकांचाही समावेश करावा, असे आवाहन शेतकऱ्यांना केले.

डॉ. गजानन लांडे यांनी सांगितले, की आपल्या शेतीमध्ये पिकांचे निरीक्षण करून योग्य वेळी एकात्मिक कीड नियंत्रणाचे उपाय वापरणे आवश्यक आहे.

या उपायासाठी निसर्गाला समजून घेतल्यास खर्चात बचत शक्य होईल. एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीमध्ये पीक लागवडीपासून कीड नियंत्रणाच्या विविध पद्धतीचा योग्य प्रकारे वापर करून किडींची संख्या आर्थिक नुकसानीच्या पातळीखाली ठेवली जाऊ शकते. त्याकरिता पर्यावरणास घातक रासायनिक औषधांची फवारणी टाळणे.

रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर टाळणे. शेती क्षेत्रात प्लॅस्टिकचा वापर कमीत कमी करणे अथवा उर्वरित प्लास्टिक कुठेही न फेकता व न जाळता ते शक्यतो रिसायकलिंगसाठी देणे. शेतमाल अवशेषांपासून खत निर्मिती करणे या याबाबत सविस्तरपणे शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन केले.

प्रा. कुलदीप देशमुख यांनी रसायनयुक्त उत्पादन पद्धतीमुळे मृदा आरोग्य धोक्यात, मृदा, जंगले, पाणी, हवा गुणवत्ता व जैवविविधतेचा समतोल बिघडला.

मातीच्या आरोग्याचा विचार न करता केवळ उत्पादनावर भर द्यावा तसेच तूर, सोयाबीन, कपाशी, उडीद या खरीप हंगामातील पिकाचे लागवड तंत्र, बीजप्रक्रिया, खते उत्पादनवाढ क्षमता याबाबत सविस्तरपणे मार्गदर्शन केले. विशाल उमाळे यांनी नद्याचे संवर्धन करणे हेही पर्यावरणाच्या दृष्टीने गरजेचे आहे.

याशिवाय पिण्याच्या पाण्याचे सर्व स्रोत स्वच्छ राखणे अगत्याचे आहे. हे सर्व साध्य करण्यासाठी लोकांच्या सहभागाची खूप आवश्यकता आहे असे सांगितले.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नितीन उगले, दिगंबर उगले, ज्ञानेश्‍वर खेळकर, महादेव बाजो, ऋषिकेश उगले, विष्णू महल्ले यांनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ‘आत्मा’चे व्ही. एम. शेगोकार यांनी केले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button