ताज्या बातम्यामहाराष्ट्र

बारावीतील मुलीचे चुंबन घेणाऱ्यास 3 वर्षांचा सश्रम कारावास


वर्धा : बारावीचे शिक्षण घेणारी मुलगी घरी एकटी असल्याचे हेरून तिला घट्ट पकडत थेट चुंबन करणाऱ्यास दंडासह तीन वर्षांच्या सश्रम करावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. हा निकाल वर्धा येथील अतिरिक्त विशेष जिल्हा न्यायाधीश-१ व्ही. टी. सूर्यवंशी यांनी मंगळवारी दिला. मनोज रघुनाथ गोडाले असे या प्रकरणातील शिक्षेस पात्र ठरलेल्या आरोपीचे नाव असून तो देवळी तालुक्यातील रहिवासी आहे.



न्यायाधीश सूर्यवंशी यांनी मनोज गोडाले यास बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ८ नुसार तीन वर्षांचा सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त तीन महिन्यांचा कारावास. भादंविच्या कलम ३५४ अन्वये तीन वर्षांचा सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त तीन महिन्यांचा साधा कारावास. तर भादंविच्या कलम ४५१ नुसार एक वर्षांचा सश्रम कारावास व एक हजारांचा दंड तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त एक महिन्यांचा कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या प्रकरणी न्यायालयात शासकीय बाजू ॲड. विनय आर. घुडे यांनी मांडली.

मामाच्या घरी राहून पीडिता घेत होती बारावीचे शिक्षण

घटनेच्या वेळी पीडिता ही मामाच्या घरी राहून बारावीचे शिक्षण घेत होती. १२ सप्टेंबर २०१८ ला रात्री १०.३० वाजताच्या सुमारास पीडितेची आजी-आजोबा पोथी ऐकण्यासाठी तर मामा फिरण्यासाठी घराबाहेर पडले होते. अशातच पीडिता ही घरी एकटी असल्याचे हेतूने मनोज याने पीडितेच्या घरात प्रवेश केला. आरोपी इतक्यावरच थांबला नाही तर त्याने घरात एकटी असलेल्या पीडितेला घट्ट पकडून तिच्या गालाचे चुंबन घेत तिचा विनयभंग केला.
बॉक्स

स्वत:ला सावरत मामाला सांगितली आपबिती

घरी एकटी असलेल्या पीडितेने मोठा धाडस करीत जोराचा धक्का देत आरोपीला घराबाहेर काढून घराचे दार बंद केले. थोड्यावेळानंतर पीडितेचा मामा घरी आल्यावर पीडितेने स्वत:ला सावरत तिच्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती मामाला दिली. संबंधित प्रकार गंभीर असल्याने पीडितेच्या कुटुंबियांनी पुलगाव पोलीस स्टेशन गाठून तक्रार नाेंदविली.

चार साक्षदारांची तपासली साक्ष

संबंधित प्रकरणी तक्रारीवरून गुन्ह्याची नोंद घेण्यात आली. या प्रकरणाचा तपास पुलगाव पोलीस ठाण्यातील तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक चेतन मराठे यांनी पूर्ण करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले. या प्रकरणी शासनातर्फे एकूण चार साक्षदारांची साक्ष न्यायालयात तपासण्यात आली. पैरवी अधिकारी म्हणून सहा. फौजदार अनंत रिंगणे यांनी काम पाहिले. दोन्ही बाजूचा युक्तीवाद आणि पुरावे लक्षात घेऊन न्यायाधीश सूर्यवंशी यांनी मनोज रघुनाथ गोडाले यास दोषी ठरवून शिक्षा ठोठावली.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button