ताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्र

बाजार समित्यांचे निकाल ही सरकारच्या कंबरड्यातली पहिली लाथ आहे – संजय राऊत


मुंबई:कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला निर्विवाद यश मिळालं आहे. याचा अर्थ महाराष्ट्रातला शेतकरी हा सध्याच्या सरकारला आणि भाजपला वैतागला असून हे निकाल ही या सरकारच्या कंबरड्यात मारलेली पहिली लाथ आहे, अशी घणाघाती टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारेल्या विविध प्रश्नांवर ते बोलत होते. सत्ताधाऱ्यांवर आसूड ओढताना संजय राऊत म्हणाले की, कृषी उत्पन्न बाजार समित्या हे शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या संस्था आणि संघटना आहेत. आतापर्यंत आपल्याला माहीत असेल की शिवसेना या निवडणुकांमध्ये फार कधी ताकदीने उतरली नव्हती. यावेळी शिवसेना महाविकास आघाडीसह बाजार उत्पन्न समितीच्या निवडणुकीत उतरली आणि भाजपचे लोक काहीही आकडे लावू द्यात. पण आपण सगळे आकडे पाहिले तर महाविकास आघाडीला बाजार उत्पन्न समित्यांमध्ये निर्विवाद यश मिळालं आहे. याचा अर्थ महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील शेतकरी हा सध्याच्या सरकारला, भाजपला वैतागला आहे, त्याला घालवायला निघाला आहे. आणि ही सरकारच्या कंबरड्यात पहिली लाथ मारली आहे. मुख्य म्हणजे मिंधे गटातले आमदार, मंत्री आहेत, त्यांच्या मतदार संघात शिवसेनेची पॅनल्स विजयी झाली आहेत. हा एक चांगला संकेत आणि लोकांच्या मन की बात स्पष्ट झाली आहे. पारोळा असेल, मालेगाव असेल किंवा अन्य अनेक भाग, जिथे जिथे शिवसेनेशी गद्दारी केलेले आमदार आहेत, तिथे शिवसेनेचं किंवा महाविकास आघाडीचंच पॅनल विजयी झालं आहे. ज्यांनी ज्यांनी शिवेसेनेवर अत्यंत घाणेरड्या पद्धतीने हल्ले केले. ते सगळे लोकं या निवडणुकीत पराभूत झाले आहेत. हा लोकमताचा कौल आहे, हा समजून घेतला पाहिजे. आम्ही वारंवार सांगतोय की आम्ही निवडणुकांना सामोरं जायला आम्ही तयार आहोत, ते या लोकांच्या हिमतीवर. ज्या 14 महानगरपालिका आहेत, आमची मागणी आहे की तुम्ही निवडणुका घ्या. पण, काल जसे निकाल लागले तसे निकाल लागतील अशी तुम्हाला भीती आहे. ही सुरुवात आहे. विधानसभा, लोकसभा, महानगर पालिका अशा प्रत्येक निवडणुकीत महाविकास आघाडीला यश मिळेल अशा प्रकारचं वातावरण या महाराष्ट्रात निर्माण झालं आहे, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.



महाराष्ट्र दिनाच्या संध्येला होणाऱ्या महाविकास आघाडीच्या विराट सभेविषयीही त्यांनी यावेळी माहिती दिली. ते म्हणाले की, उद्या 1 मे, महाराष्ट्र दिन. वांद्रे येथील बीकेसीमध्ये महाविकास आघाडीची अतिविराट अशी सभा होत आहे. त्या सभेचं चित्रही स्पष्ट आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या ज्या प्रमुख सभा होताहेत. नागपूर आणि संभाजीनगर या दोन शहरांनंतर महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये महाविकास आघाडीची सभा होत आहे आणि त्या सभेच्या नियोजनामध्ये शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सगळे प्रमुख पक्ष एकत्र येऊन काम करत आहेत. या सभेसाठी आदित्य ठाकरे विशेष मेहनत घेताना तुम्हाला दिसतील. काल संध्याकाळी ते मैदानावर होते, त्यानंतर सातत्याने बैठका घेतल्या. आम्ही सगळे त्यात होतो. पण उद्याची सभा ही ऐतिहासिक ठरेल. आणि महाराष्ट्राच्या जनमानसाचा निकाल कोणाच्या बाजूने आहे ते उद्या महाराष्ट्राची राजधानी ठरवेल. तयारी पूर्ण झाली आहे आणि कोणतेही अडथळे या सभेत येणार नाही. उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीचे सगळे प्रमुख नेते या सभेला उपस्थित राहतील, असं राऊत यावेळी म्हणाले.

याच दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्याविषयीही त्यांनी टीका केली. उद्याची आमची सभा आहे, त्या सभेची तयारी पाहायला अमित शहा आले आहेत. ते जेव्हा नागपूरला सभा होती, तेव्हा ते खारघरला आले होते. आपण पाहिलं असेल काय झालं ते. आता उद्या आमची मुंबईत सभा आहे. त्यामुळे सभेची तयारी, आवाका, जोश हे पाहण्यासाठी देशाचे गृहमंत्री जर आले असतील तर त्यांचं स्वागत आहे, असं राऊत म्हणाले.

बारसू येथे चाललेल्या आंदोलनाचा पुनरुच्चार करताना राऊत म्हणाले की, बारसूचा विषय महत्त्वाचा आहे. अजूनही तिथे अत्याचार सुरू आहेत, अजूनही तिथे पोलीस कारवाया सुरू आहेत. अजूनही तिथे शेतकऱ्यांवर, महिलांवर, तरुणांवर जोरजबरदस्ती सुरू आहे. धमक्या दिल्या जात आहेत. कुणासाठी? उद्धव ठाकरे यांना कोकणात पाय ठेवू दिला जाणार नाही, ही सुद्धा धमकी आहे. अशा धमक्यांना शिवसेना भीक घालत नाही. उद्धव ठाकरे यापूर्वी अनेकदा कोकणात गेले आहेत, जात असतात आणि यावेळेलाही जातील. हिंमत असेल तर अडवा. अडवून दाखवा. ते लांबून कुठेतरी तोंड काळं झाल्यासारखा काळा झेंडा दाखवायचा, हे नको. आम्ही 100 वेळा कोकणात येतो आणि जातो. काय करता तुम्ही? कोकण हे कुणाच्या मालकीचं नाहीये. कोकण हे शिवसेनेचं पॉवर सेंटर आहे. या कोकणाने शिवसेनेला नेहमी ताकद दिली आहे. आजही मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हा संपूर्ण पट्टा हा मराठी माणसाच्या स्वाभिमानाचा आणि शिवसेनेच्या अस्मितेचा पट्टा आहे. उद्धव ठाकरे हे बारसूत जातील, त्याविषयी कुणीही चिंता बाळगण्याचं कारण नाही. लोकांची इच्छा आहे की उद्धव यांनी जावं आणि उद्धव ठाकरे जात आहेत. आमची जनता आहे. 6 मेला महाड येथे उद्धव ठाकरे यांची प्रचंड मोठी सभा आहे. ते सुद्धा कोकणातच येतं. कोकणात कुणाचे पाय घट्ट आहेत आणि कुणाचे लटपटताहेत, हे आधीही जनतेने दाखवलं आहे. यापुढेही दाखवलं जाईल, असं राऊत म्हणाले.

कर्नाटक निवडणुकाच्याबाबत बोलताना म्हणाले, आम्ही स्वतः महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रचाराला जातोय. राष्ट्रवादीचे काही प्रमुख नेतेही प्रचाराला जात आहेत. बेळगाव-कारवार हा मराठी भाषिकांचा सीमाभागासाठी, एकीकरण समितीसाठी शिवसेना आणि शरद पवार हे वचनबद्ध आहोत. कारण, आम्ही सगळे अनेक वर्षं त्या आंदोलनात सहभागी झालो होतो. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना त्या काळात सीमाप्रश्नासाठी तीन वर्षांचा कारावास झाला होता, हे आम्हाला विसरता येणार नाही. बेळगावसाठी 69 हुतात्मे त्या काळात दिले आहेत. अखंड महाराष्ट्रासाठी असं हौतात्म्य पत्करणारा शिवसेना हा एकमेव पक्ष आहे. आमचे 69 शिवसैनिक मारले गेले त्यामुळे एकीकरण समितीच्या पाठीशी उभं राहण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. खरं म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांनी बेळगावात जाऊन महाराष्ट्र एकीकरण समितीचा प्रचार करायला पाहिजे. पण, दिसतंय ते उलटंच. इथून जे भाजपच्या फौजा गेल्या आहेत, त्या एकीकरण समितीच्या उमेदवारांचा पराभव करायला गेल्या आहेत. पाहा तुम्ही, लाज वाटली पाहिजे तुम्हाला. इथे बेळगावचे लोक लाठ्या काठ्या, तुरुंगवास भोगताहेत. इकडे तुम्ही राज्यपालांच्या अभिभाषणात बेळगाव आमचं असं सांगताय. सुप्रीम कोर्टात सरकारतर्फे लढाई सुरू आहेत आणि भाजपचे लोक इथून बेळगावसह सीमाभागात मराठी लोकांचा पराभव करायला चालले आहेत, हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. मुख्यमंत्री वारंवार सांगतात की, आम्ही बेळगावमध्ये जाऊन आंदोलन केलंय. जर तुम्ही खरोखर त्या आंदोलनात सहभागी झाला असाल तर तुम्ही आत्ता जाऊन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांचा प्रचार करा आणि भाजपच्या उमेदवारांचा पराभव करण्याचं आवाहन करा. देवेंद्र फडणवीस काल मॉरिशसला होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा तिथे फडकला म्हणून त्यांना आनंद झाला पण बेळगाव छत्रपती शिवरायांचा भगवा वारंवार उतरवला जातो, त्याबद्दल त्यांनी काही भूमिका जर घेतली आणि ते बेळगावात जाऊन एकीकरण समितीच्या प्रचारात सहभागी झाले तर आम्ही त्यांचा सत्कार करू. आहे हिंमत? आम्ही चाललो आहोत, असं राऊत म्हणाले.

अश्याच माहितीसाठी आणि बातम्यासाठी येथे🪀 क्लिक करून whatsapp ग्रुपला नक्की जॉइन व्हा.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button