ताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतीच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचवा; अब्दुल सत्तार यांचा अधिकाऱ्यांना आदेश


पुणे : खरीप हंगामातील पिकांसाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या सरकारी योजनांचा लाभ घेता आला पाहिजे. या योजनांच्या अंमलबजावणीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल.यासाठी कृषी विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शेतीच्या सरकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचवाव्यात, असा आदेश राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी मंगळवारी (ता.२५) पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या कृषी विभागाच्या विविध बैठकीत बोलताना दिला.कृषी मंत्री सत्तार यांनी आज कृषी आयुक्तालयात कृषी विभागातील विविध योजनांचा आढावा घेतला. या बैठकीला कृषी आयुक्त सुनील चव्हाण, स्मार्टचे प्रकल्प संचालक कौस्तुभ दिवेगांवकर, विस्तार व प्रशिक्षण विभागाचे संचालक दिलीप झेंडे, कृषी प्रक्रिया व नियोजन विभागाचे संचालक सुभाष नागरे, मृद्संधारण व पाणलेाट क्षेत्र व्यवस्थापन संचालक रवींद्र भोसले, ‘आत्मा’चे संचालक दशरथ तांभाळे आणि चारही कृषी विद्यापीठांमधील शास्त्रज्ञ उपस्थित होते.

सत्तार पुढे म्हणाले, ”शेतकऱ्यांना पुरविण्यात येणारी बियाणे ही चांगल्या दर्जाची असली पाहिजेत. यासाठी राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी सातत्याने संशोधन करून बियाणे निर्माण करावीत. खासगी बियाणे उत्पादकांसोबत बियाणांच्या बाबतीत निकोप स्पर्धा झाली तरच शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकणार आहे. कृषी विद्यापीठांनी आपापल्या उत्तम संशोधनाचे योग्य ते मार्केटिंग करावे व अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत त्याची माहिती पोचवली पाहिजे.”

दरम्यान, कृषी विभागाशी संबंधित धोरणात्मक बाबींवर विचारविनिमय करण्यासाठी पुणे येथे एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. जागतिक हवामानबदलाचे परिणाम पाहता कृषी विकासासाठी वेगवेगळ्या घटकांची मते जाणून घेऊन, त्यानुसार प्रत्यक्ष कार्यवाही करणे गरजेचे आहे. या धोरणात्मक बाबींमध्ये कृषी तंत्रज्ञ, या क्षेत्रातील अभ्यासक आणि शेती घटकावर परिणाम करणाऱ्या विभागांची मते अजमावून घेण्यासाठी पुणे शहरात एक दिवशीय कार्यशाळा आयोजित केली जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button