ताज्या बातम्यामहाराष्ट्र

कारागृहातील 120 कैदी घेत आहेत मुंबई आयआयटीचे प्रोग्रामिंग शिक्षण


नाशिक : नाशिक शहरालगत असलेल्या नाशिकरोड कारागृहातील कैद्यांचे अपूर्ण असलेले शिक्षण पूर्ण व्हावे, कारागृहातून सुटल्यानंतर त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी कारागृहात स्थापन केलेल्या संगणक कक्षात सध्या 120 कैदी मुंबई आयआयटी यांनी तयार केलेल्या प्रोग्रामिंगचे शिक्षण घेत आहेत. समाजात शिक्षणाला खूप महत्व आहे. शिक्षणामुळे माणूस सज्ञान बनतो. याच पार्शवभूमीवर कैद्यांना शिक्षण देण्याचा अभिनव प्रयोग नाशिकरोड कारागृहात राबविण्यात येत आहे.



सद्यस्थितीत 109 जण डिग्री व डिप्लोमाचे शिक्षण घेत आहेत. नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात शिक्षा बंदी व न्यायाधीन असे जवळपास 3 हजार कैदी आहेत. नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात मुंबईच्या समता फाउंडेशनच्या मदतीने कैद्यांना शिक्षणासाठी स्वतंत्र संगणक कक्षाची स्थापना 2019 मध्ये करण्यात आली आहे. या वर्षी 120 कैदी कारागृहात मुंबई आयआयटीने तयार केलेल्या प्रोग्रामिंगचे शिक्षण घेत आहेत. आयआयटीच्या प्रोग्राममध्ये वर्षभरात चार परीक्षा होणार आहेत. सध्या कारागृहात तीन बॅचमध्ये कैदी शिक्षण घेत आहेत.

दरम्यान 2019 पासून पाचशेहून अधिक कैद्यांनी आयआयटीच्या प्रोग्रामचे शिक्षण पूर्ण केले आहे. समता फाउंडेशनकडून प्रशिक्षकांचीदेखील नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान मागील 7 वर्षांत दीड हजार कैद्यांनी शिक्षण पूर्ण केले असून विशेष म्हणजे पदविका शिक्षण पूर्ण करणाऱ्या कैद्यांना शिक्षेमध्ये 90 दिवसांची माफी आहे.

कारागृहात 2014 पासून यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे केंद्र सुरु असून आतापर्यंत 900 कैद्यांनी शिक्षण पूर्ण केले आहे. तर 2016 पासून इंदिरा गांधी राष्ट्रीय विद्यापीठाच्या अंतर्गत 600 कैद्यांनी शिक्षण पूर्ण केले आहे. याशिवाय सटिफिकेट कोर्स इन फूड न्यूट्रीशियनसाठी आठ कैदी, सर्टिफिकेट इन ह्युमन राईट्ससाठी 24 कैदी, सर्टिफिकेट इन रूरल डेव्हलपमेंट साठी 40 असे एकूण 86 कैदी इतर कोर्सेस करत आहेत. विधी अभ्यासक्रम पात्रता (सीईटी) परीक्षेस बसण्यासाठी उपमहानिरीक्षकांनी पाच कैद्यांना परवानगी दिली आहे. तसेच कारागृहात पुरुष व महिला कैद्यांसाठी स्वतंत्र शिवण काम प्रशिक्षण केंद्र चालविले जात असून सध्या 65 कैदी लाभ घेत आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button