पुण्यात रेशनिंग तांदळाचा काळाबाजार, 2 हजार 700 किलो तांदूळ जप्त..

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


पुणे : स्वस्त धान्य दुकानात विक्रीसाठी असलेला रेशनिंगच्या तांदळाची खूल्या बाजारात विक्री करण्यासाठी निघालेला टेम्पो खडक पोलिसांच्या पथकाने पकडला. काशेवाडी येथून दौंड तालुक्यातील केडगाव येथे हा टेम्पो निघाला होता.

पोलिसांनी टेम्पोतून तब्बल 2 हजार 700 किलो तांदूळ जप्त केला असून तिघांना अटक केली आहे.

जावेद लालू शेख (35), अब्बास अब्दुल सरकावस (34), इम्राण अब्दुल शेख (30, रा. सर्व. काशेवाडी, भवानी पेठ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत खडक पोलीस ठाण्यातील अंमलदार महेश प्रकाश जाधव यांनी फिर्याद दिली आहे. मंगळवारी (दि.11) दुपारी साडेबाराच्या सुमारास काशेवाडी, भवानी पेठ भागात ही कारवाई करण्यात आली. रेशनिंगचा हा तांदूळ केवळ सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानात विक्रीसाठी असतो. नागरिकांना कमी दरामध्ये हा तांदूळ उपलब्ध करून दिला जातो. मात्र, आरोपी शेख, सरकावस यांनी शहरातील वेगवेगळ्या रेशनिंग दुकानदारांकडून काळ्या बाजारात हा माल विकत घेतला. त्यानंतर एका टेम्पोमध्ये हा माल भरून तो दौंड तालुक्यातील केडगाव येथे विक्रीसाठी नेण्याचा प्लॅन आखला. याबाबतची माहिती खडक पोलिसांना मिळाली. त्यानूसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगिता यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून आरोपींना तांदळाने भरलेल्या टेम्पोसह रंगेहाथ पकडण्यात आले. आरोपी केडगावमध्ये हा तांदळ विक्रीसाठी नेत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानूसार पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यांच्याकडे सखोल तपास करण्यात येत आहे.

…मोठे रॅकेट असण्याची शक्यता

दौंड तालुक्यात विक्रीसाठी हा तांदूळ नेण्याचा आरोपींचा प्लॅन होता. त्यांनी शहरातील काही स्वस्त धान्य दुकानदारांकडून हा तांदूळ विकत घेतला. त्यामुळे यामध्ये काही दुकानदारांचाही समावेश आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात तांदळाचा काळाबाजार होत असल्याने या रॅकेटची व्याप्ती मोठी असल्याचे बोलले जात आहे.

तांदळाने भरलेल्या टेम्पोसह तिघांना रंगेहाथ पकडण्यात आले असून त्यांच्याकडून 2 हजार 700 किलो तांदूळ जप्त करण्यात आला आहे.