महाविकास आघाडीच्या सभेस पोलिसांकडून परवानगी

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


छत्रपती संभाजीनगर : (आशोक कुंभार ) भारतीय जनता पक्षाकडून सुरू असणाऱ्या जुलमी कारवाईची माहिती देत महाविकास आघाडीची बांधणी जिल्हा पातळीवर करण्यासाठी २ एप्रिल रोजी आयोजित ‘ वज्रमूठ’ सभा घेण्यास पोलिसांनी परवानगी दिली असल्याची माहिती विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी दिली. छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर या सभेला परवानगी मिळणार नाही, यावरून चर्चा सुरू होती.

महाविकास आघाडीच्या या सभेस माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती असणार आहे. या सभेला मोठी गर्दी व्हावी यासाठी ठाकरे गटाचे नेते खासे प्रयत्न करत असून काँग्रेस व राष्ट्रवादीकडूनही या प्रयत्नांना सहकार्य होत आहे. याच दिवशी त्याच वेळी भाजपच्या वतीने ‘ सावरकर यात्रा’ काढली जाणार आहे. त्यांचे हे कृत्य खोडसाळपणाचे असून त्यांना सावरकरांचा विज्ञानवाद मान्य आहे का, त्यांचे विचार पेलण्याची ताकद भाजपमध्ये नाही. त्यांनी जरूर यात्रा काढावी पण खोडसाळपणा करू नये, असे अंबादास दानवे म्हणाले.

ही सभा अधिक गर्दीची तर असेलच पण त्यातून मिळणारा संदेश लोकशाहीच्या मजबुतीकरणाचा असल्याने या सभेचे महत्त्व अधिक असल्याचा दावा केला जात आहे. पोलिसांनी १६ अटींवर सभेस परवानगी दिली असून अशा प्रकारच्या अटी टाकूनच सभेला परवानगी दिली जाते. त्यात नवे काही नाही. सर्व अटींचे पालन करून शहरात शांतता राहील अशाच प्रकारे सभेचे आयोजन केले जाईल असे दानवे म्हणाले.