ताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्र

महागाईचा भडका! घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ, व्यावसायिक सिलिंडरही महागलं!


दिल्ली :आधीच महागाईच्या भडक्यात होरपळून निघालेल्या सर्वसामान्य नागरिकांची चिंता वाढवणारी बातमी आहे. कारण, मार्च महिना सुरू होताच पुन्हा एकदा महागाईचा भडका उडाला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी मार्च महिन्याच्या पहिल्याच तारखेला गॅस सिलिंडरच्या नवीन किमती जाहीर केल्या आहेत. त्यानुसार घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.

भारतीय इंधन कंपन्यांनी जारी केलेल्या नव्या दरानुसार, १ मार्चपासून घरगुती गॅस सिलिंडरचे (Cylinder) दर ५० रुपयांनी वाढवण्यात आले आहे. याशिवाय १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरातही तब्बल ३५० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. आधीच महागाईच्या भडक्यात होरपळून निघालेल्या सर्वसामान्यांना बसलेला हा मोठा धक्का मानला जात आहे.

गॅस सिलिंडरचे नवीन दर काय?

सरकारी तेल कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, घरगुती गॅस (LPG Gas) सिलिंडरचे दर ५० रुपयांनी वाढवण्यात आल्याने मुंबईत १४.२ किलोच्या घरगुती सिलिंडरची किंमत आता १ हजार १०२ इतकी झाली आहे. बुधवारी सकाळपासून घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात ५० रुपयांनी वाढ झाल्याने शहरातील लाखो ग्राहकांवर खर्चाचा बोजा वाढला आहे.

दरम्यान, याआधी मुंबईत LPG सिलिंडरची किंमत (Cylinder Price) १ हजार ५२ रुपये प्रति युनिट इतकी होती. जुलै महिन्यानंतर पुन्हा एकदा सिलिंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे. दरम्यान, एलपीजी गॅसच्या किमतीत कपात होण्याची शक्यता व्यक्त होत असतानाच त्यात वाढ करण्यात आल्याने गृहिणींचे बजेट आता कोडलमडणार आहे. दुसरीकडे घरगुती गॅस सिलिंडर पाठोपाठ व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरातही तब्बल ३५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

त्यामुळे १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरचे दर २ हजार ११९ इतके झाले आहेत. विशेष बाब म्हणजे, गेल्या चार महिन्यात घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती वाढवण्यात आल्या नव्हत्या. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी फेब्रुवारीमध्ये देशाचा अर्थसंकल्प मांडल्यानंतर महागाईपासून दिलासा मिळेल अशी आशा सर्वसामान्यांना होती. मात्र, गॅस सिलिंडरचे दर वाढल्याने या आशेवर पाणी फेरले गेले आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button