रस्त्यातील टेम्पो बाजूला काढण्यास सांगितला असत महिलेला शिवीगाळ व धक्काबुक्की करत महिलेचा विनयभंग केला. तसेच मी कोय़ता गँगचा सदस्य आहे, पोलीस माझे काही बिघडवू शकत नाही म्हणत महिलेला जिवे मारण्याची धमकी दिली हा धक्कादायक प्रकार हिंजवडी येथे वाडकर चौक येथे 12 फेब्रुवारी रोजी घडला.
या प्रकरणी मंगळवारी (दि.21) महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून तुषार कोकरे, नितीन कोकरे व त्यांचे दोन साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या त्यांच्या दुचाकीवरून घरी जात असताना वाडकर चौकात रस्त्यात टेम्पो लावून मोठमोठ्याने गाणी लावण्यात आली होती. यावेळी फिर्यादी यांनी आरोपींना टेम्पो बाजूला काढात गाणी बंद करा, वाहतूक कोंडी होत आहे असे सांगितले.
याचा राग येऊन आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ करत फिर्यादीला ढकलून दिले व मी कोथरूडचा आहे, कोयता गँगचा आहे, पोलीस आमचे काही बिघडवू शकत नाही अशी हुज्जत घातली. फिर्यादी घरी आल्या त्यांनी त्यांच्या पती व इतरांना याबद्दल सांगितले व पोलिसांनाही तक्रार केली.
यावेळी आरोपी फिर्यादीच्या बिल्डींग येथे आले व त्यांनी पुन्हा फिर्यादीला ढकलून देत त्यांच्यासमोर अश्लील हावभाव करत त्यांचा विनयभंग केला. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. यावरून हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.