ताज्या बातम्यामहाराष्ट्र

न्यायालय परिसरात दुसऱ्या दिवशीही शस्त्रधारी गुंड शिरले


साक्ष सुरू असताना कंबरेला चॉपर लावून आलेल्या गुंडाला गुन्हे शाखेने ताब्यात घेतले.

दर्शन ऊर्फ चंद्रकांत राजकुमार शर्मा (वय ३२, रा. शनिपेठ, कांचननगर, जळगाव) याला धारदार शस्त्रासह अटक करण्यात आली.

सलग दुसऱ्या दिवशी शस्त्रधारी

माजी महापौर अशोक सपकाळे यांचा मुलगा राकेश अशोक सपकाळे याचा ४ नोव्हेंबर २०२० ला शिवाजीनगर स्मशानभूमीजवळ ‘लाडू गँग’च्या गुंडानी हल्ला करून खून केला होता. शहर पोलिस ठाण्यात दाखल खुनाच्या गुन्ह्यात गणेश दंगल सोनवणे (रा. वाल्मीकनगर), विशाल संजय सपकाळे (राजारामनगर,)

रुपेश संजय सपकाळे (कांचननगर) आणि महेश राजू निंबाळकर यांना अटक करण्यात आली होती. या चौघांचा बॉस अन्‌ लाडू गँगचा म्होरक्या आकाश मुरलीधर सपकाळे (वय २३, रा. कांचननगर) या पाच संशयितांना अटक होऊन पैकी काही संशयित जामिनावर बाहेर आले असून, जिल्‍हा व सत्र न्यायाधीश वसावे यांच्या न्यायालयात खटल्याची सुनावणी सुरू आहे.

मंगळवारी या खटल्यात महत्त्वाचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार सोनू अशोक सपकाळे याची साक्ष नोंदविण्यात येणार असल्याने सकाळपासूनच न्यायालयात मृत राकेश सपकाळे याचे कुटुंब कबिल्यासह सर्वच न्यायालयात हजर होते.

लाडू गँगचा म्होरक्या आकाश सपकाळे खुनाच्या गुन्ह्याचा सूत्रधार असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. मंगळवारी न्यायालयात पहिलीच साक्ष होत असल्याने लाडू गँगची तयारीही जोरात होती. न्यायालय आवारात दोन्ही टोळ्या गर्दी करणार म्हणून गुन्हे शाखेचे निरीक्षक किशन नजन पाटील यांच्या पथकातील संजय हिवरकर, विजय पाटील, राजेश मेंढे, संतोष मायकल साध्या वेशात न्यायालयात आले होते.

काही अट्टल गुन्हेगार साध्या वेशातील पोलिसांना पाहून पसार झाले, तर गर्दी होऊ नये म्हणून पोलिसांनी जमाव पांगविला. त्यात काही निघून गेले. त्यांच्याकडेही पिस्तूल, चॉपरसारखे शस्त्र असल्याचे सांगण्यात आले.

टोळीचा म्होरक्या आकाश मुरलीधर सपकाळे याचा साथीदार चंद्रकांत ऊर्फ दर्शन राजकुमार शर्मा (वय ३२, रा. शनिपेठ, कांचननगर) यांच्या कंबरेत धारदार चायनिज चॉपर आढळून आला. पोलिसांनी तिथेच त्याला झडप घालत ताब्यात घेतले.

आजही थोडक्यात चुकला नेम

चंद्रकांत राजकुमार शर्माला चॉपरसह अटक केल्यानंतर न्यायालय आवारात असलेल्या टोळी गुन्हेगारांची एकच धावपळ उडून जो-तो मिळेल त्या वाटेने न्यायालयातून फरारी झाला. लाडू गँगवर सपकाळेंचा वॉच, तर सपकाळेंवर लाडू गँगचा डोळा असल्याने दोन्हीकडील गँगवार उसळल्यावर त्यात पिस्तूल, चाकू-सुऱ्यांचा सर्रास वापर झाला असता, हे मात्र निश्‍चित. ताब्यातील दर्शन पोलिस चौकशीत नेमकी काय माहिती देतो, त्यावर नेमका स्पॉट कोणाचा लागणार होता, हे निश्‍चित होणार आहे.

किरकोळ वादातून ४ नोव्हेंबर २०२० ला महापौर पुत्र सोनू अशोक सपकाळे याला लाडू गँगने शिवाजीनगर स्मशानभूमीजवळ घेरले. हॉटेलचे काम संपवून त्याचा मोठा भाऊ राकेश सपकाळे मागून त्याच मार्गाने घराकडे निघाला होता.

लहान भावाला वाचविण्यासाठी त्याने मध्यस्थी केली. मात्र, हल्लेखोर पूर्ण तयारीनिशी असल्याने त्यांनी एकामागून एक शस्त्राचे वार सुरू करून सोनूला वाचविणाऱ्या राकेश सपकाळेलाच चॉपरने गोंदून काढले. त्यात त्याचा मृत्यू झाला. यातूनच २३ सप्टेंबर २०२१ ला लाडू गँगचा म्होरक्या आकाश सपकाळेच्या घरावर पिस्तूल, चॉपरसह हल्ला चढविण्यात आला.

तेव्हा गावठी पिस्तूलची गोळी अडकल्याने आकाश बालंबाल बचावला. दोन्ही टोळ्यांना अटक केल्यांतर तिसऱ्या दिवशी न्यायालयात हजर करताना समोरासमोर येऊन न्यायालयातच मोठा गेम होणार होता. मात्र, तेव्हाही पोलिसांनी खबरादारी घेतल्याने अनर्थ टळला.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button