12 वीच्या परीक्षेसाठी आलेली मुलगी प्रियकरासोबत फरार; केंद्राबाहेर थांबलेल्या वडिलांचे डोळे पाणावले

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


जहानाबाद : बिहारच्या जहानाबादमधून प्रेमप्रकरणाची एक अनोखी घटना समोर आली आहे. इथे परीक्षा केंद्रावर परीक्षा देण्यासाठी आलेली विद्यार्थिनी तिच्या प्रियकरासोबत पळून गेली.

विद्यार्थिनीचे वडील परीक्षा केंद्राबाहेर आपल्या मुलीची वाट पाहत राहिले. दुसरीकडे, मुलीने आधीच प्रियकरासोबत पळून जाण्याचा बेत आखला होता. परिक्षेसाठी गेलेली मुलगी बराच वेळ झाल्यानंतरही परत न आल्याने घरच्यांना काळजी वाटू लागली. वडील इकडे-तिकडे पाहू लागले, पण मुलगी सापडली नाही. यानंतर वडिलांनी पोलिसांत अर्ज दाखल करून गावातीलच एका तरुणावर गुन्हा दाखल केला. ही घटना जहानाबादच्या मुरलीधर हायस्कूल परीक्षा केंद्रामधील आहे.

प्रियकर दुचाकीवर बसून बाहेर थांबला होता
संबंधित विद्यार्थीनीचा प्रियकर परीक्षा केंद्राबाहेर तिची वाट पाहत होता, असे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे परीक्षा संपताच तो प्रेयसीला दुचाकीवर बसवून पळून गेला. लक्षणीय बाब म्हणजे केंद्राबाहेर वडील मुलीची वाट पाहत होते, मात्र मुलगी न आल्याने एकच खळबळ माजली. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी तात्काळ शहर पोलीस ठाणे गाठून मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली. तसेच मुलाने मुलीला आमिष दाखवून पळवून नेल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

पोलिसांत तक्रार दाखल
दरम्यान, याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी गावातीलच चंदन कुमार या तरुणाविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. याबाबत एसडीपीओ अशोक कुमार पांडे यांनी सांगितले की, विद्यार्थीनीच्या वडिलांच्या अर्जाच्या आधारे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप या मुलीचा शोध लागलेला नाही. तसेच आरोपीचा सुगावा लागलेला नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. विद्यार्थिनीला ताब्यात घेऊन आरोपीला अटक करण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत.