बीड तिहेरी हत्याकांड, पती-पत्नी, बाळंतीण मुलीचा खून करणाऱ्यांना जन्मठेप

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


बीड : गेवराई येथील सरस्वती कॉलनीत भवानी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या मुख्य शाखेतील प्रमुख वसुली अधिकारी तथा वरिष्ठ व्यवस्थापक आदिनाथ उत्तमराव घाडगे यांच्या घरी सशस्त्र दरोडेखोरांनी धुमाकूळ घालत घाडगे दाम्पत्याची हत्या करून दोन मुलींवर हल्ला केला होता.

उपचारादरम्यान बाळंतीण मुलीचाही मृत्यू झाला होता. दरम्यान, पाच वर्षांपूर्वीच्या या घटनेत दोन आरोपींना येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्या. हेमंत महाजन यांनी १७ जानेवारी रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

गेवराई शहरातील गणेशनगरातील सरस्वती कॉलनीत बँक अधिकारी आदिनाथ उत्तमराव घाडगे (वय ५०) राहत. २४ ऑगस्ट २०१७ रोजी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास दरोडेखोरांनी कटावणीने कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला.दरोडेखोरांनी आदिनाथ व अलका घाडगे (४२) यांच्यावर धारदार शस्ञांनी हल्ला चढवला. यानंतर बाळंतपणासाठी आलेली मुलगी वर्षा संदीप जाधव (२२) व स्वाती घाडगे (१८) या दोन्ही मुलींवरही धारदार शस्ञाने हल्ला करून ऐवज लुटला होता. यात जखमी वर्षाचा उपचारादरम्यान वर्षभरानंतर मृत्यू झाला होता. गेवराई ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तत्कालीन पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, उपअधीक्षक डॉ. अर्जुन भोसले यांनी वेगाने तपासचक्रे फिरवली. त्यानंतर सोमा शेरू भोसले (रा. केकतपांगरी ता.गेवराई, हमु. अचानकनगर, गेवराई) व लखन प्रताप भोसले (रा.कौडगाव घोडा ता.परळी) यांना अटक केली होती. आरोपींकडून घाडगे यांच्या घरातून चोरून नेलेला मोबाइल हस्तगत केला होता. तपास करून उपाधीक्षक डॉ. अर्जुन भोसले यांनी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.

२२ साक्षीदार तपासले
प्रमुख जिल्हा सत्र न्या. हेमंत महाजन यांच्यासमोर प्रकरणाची सुनावणी झाली. जिल्हा सरकारी वकील अजय राख यांनी सरकार पक्षाकडून बाजू मांडली. त्यांनी २२ साक्षीदार तपासले. अजय राख यांचा युक्तिवाद, साक्षीपुरावे ग्राह्य धरून न्या. हेमंत महाजन यांनी दोन्ही आरोपींना १६ जानेवारीला दोषी ठरवले. १७ जानेवारीला जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.