नागपूर

आधुनिक बाबींचा वापर करून शेतीचे वृद्धीकरण करणे गरजेचे


नागपूर : शेतीचे उत्पादन वाढविणे, आपत्कालीन परिस्थिती ओढवल्यास वेळेत नुकसानभरपाई मिळणे आणि आधुनिक बाबींचा वापर करून शेतीचे वृद्धीकरण करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीचा अवलंब केल्याने मध्यप्रदेशचा कृषी विकासदर गेल्या १२ वर्षांपासून १८ टक्क्यांपेक्षा अधिक आहे.यासाठी फक्त पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता आधुनिक शेतीकडे वळले पाहिजे, असे मत मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी व्यक्त केले.



ॲग्रोव्हिजन फाउंडेशनतर्फे आयोजित ॲग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनाचे उद्‍घाटन मुख्यमंत्री चौहान यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. दाभा येथील पीडीकेव्ही मैदानावर आयोजित या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ॲग्रोव्हिजनचे मुख्य प्रवर्तक व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी होते. मंचावर ॲग्रोव्हिजनचे सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. सी. डी. मायी, खासदार रामदास तडस, खासदार कृपाल तुमाने, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, माजी खासदार विकास महात्मे, आमदार प्रवीण दटके, मत्स्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आशिष पातूरकर, ॲग्रोव्हिजनचे संयोजक गिरीश गांधी, संघटन सचिव रमेश मानकर, रवी बोरटकर, फाउंडेशनचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. ‘भविष्यातील शेती : अन्न, चारा आणि इंधन’ ही यंदाच्या चार दिवसीय ॲग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनाची संकल्पना आहे.

गडकरींबद्दल बोलताना शिवराजसिंह चव्हाण म्हणाले, नितीन गडकरींनी अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून केलेले मार्गदर्शन आपण शिकायला हवे. संपन्न, समृद्ध आणि शक्तिशाली भारत निर्माण करण्यात नितीन गडकरी यांचा हात आहे. त्यांनी अद्‍भुत काम केले आहे. गडकरींच्या मार्गदर्शनात सुरू झालेले हे प्रदर्शन शेतकऱ्यांचे जीवन बदलण्याचे काम करीत आहे. अशक्य वाटणाऱ्या गोष्टी ते तंत्रज्ञानाच्या मदतीने शक्य करीत आहेत. या प्रयोगाचा शेतकऱ्यांना तर फायदा होतोच सोबत पर्यावरणासह पृथ्वीवर राहण्यायोग्य वातावरणाची निर्मितीसुद्धा यातून होते. संचालन रेणुका देशकर यांनी केले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button