ताज्या बातम्या

गायरानप्रश्नी मुदतवाढ घेणार : मुख्यमंत्री


जयसिंगपूर,  : गायरानावरील अतिक्रमणाचा निर्णय हा न्यायालयाचा आहे. याला मुदतवाढ घेऊ. याप्रश्नी सरकार तुमच्याबरोबर आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी दिली.
पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढला जाईल. त्यासाठी गरज भासल्यास वर्ल्ड बँकेची मदत घेऊ, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

जयसिंगपूर येथे आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी आयोजित केलेल्या ‘जनसंवाद मेळाव्या’त मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे भूमिपूजन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले.

आजपर्यंत राज्यात धनदांडगेच मुख्यमंत्री झाले; पण आता शेतकर्‍याचा मुलगा मुख्यमंत्री झाला आहे. म्हणून हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. आम्ही कधी बघतो, करतो, असे म्हटले नाही. काम आले की, ते पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसत नाही. आम्ही घोषणा करणारे नव्हे; तर ते अंमलात आणणारे आहोत. आम्ही घरात बसून काम करीत नाही; तर शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन काम करणारे आहोत, असा टोला मुख्यमंत्र्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांत भाजपला क्रमांक 1 व शिंदे गटाला क्रमांक 2 चे बहुमत मिळाले आहे. ज्यांनी शेतकर्‍यांना 50 हजार देण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांनी पैसे दिले नाहीत. ते आम्ही दिल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यभरात परतीच्या पावसाने शेतकर्‍यांचे नुकसान झाले. मात्र, आम्ही शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडणार नाही. प्रोत्साहन अनुदानाला एका क्लिकमध्ये अडीच हजार कोटींची मदत करणारे आमचे सरकार आहे.

अल्पसंख्याकांसाठी 25 कोटी

शिरोळ तालुक्याला अल्पसंख्याकांसाठी 25 कोटी रुपयांचा निधी देत असल्याची घोषणा करीत, आपण आता कामानेच उत्तर देऊ, कोण काय म्हणते याकडे लक्ष द्यायला वेळ नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

महापुराच्या संकटातून वाचवा

1999 पासून शिरोळच्या जनतेने आपल्यावर विश्वास दाखविला आहे. शिरोळ, हातकणंगले तालुक्यांत स्व. श्यामराव पाटील यांच्या माध्यमातून सहकाराचे जाळे विणले आहे. शिरोळ तालुुका हा चार नद्यांमुळे समृद्ध असला तरी तो महापुरामुळे बाधित होत आहे. 47 गावांना महापुराचा तडाखा बसत असल्याने संसार कोलमडत आहे. त्यामुळे अलमट्टीची पाणी पातळी व पाण्याचे धोरण हे कायमस्वरूपी निश्चित करणे गरजेचे असल्याचे आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले.

गायरान अतिक्रमणे काढल्यास 40 हजार कुटुंबे उघड्यावर

खिद्रापूर व नृसिंहवाडी तीर्थक्षेत्राबरोबर तालुक्याच्या विकासाला गती देण्याची गरज आहे. तालुक्यात क्षारपड जमिनीचा प्रश्न भेडसावत असून, तो मार्गी लावण्याची गरज आहे. सध्या गायरानावरील अतिक्रमण काढण्याच्या निर्णयामुळे तालुक्यातील 5 हजार 174 कुटुंबे, तर जिल्ह्यात 40 हजार कुटुंबे उघड्यावर पडणार आहेत. त्यामुळे नवीन नियमावली करून हा प्रश्न मार्गी लावावा. शहरात बौद्धविहारसाठी मंजूर केलेला 7 कोटी रुपयांचा पूर्ण निधी मिळावा, अशी मागणी यड्रावकर यांनी केली.

शिरोळ, हातकणंगले तालुक्यांचा दौरा करून यात इचलकरंजी, नृसिंहवाडी, जयसिंगपूर, खिद्रापूरसह तालुक्यातील विविध प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

मार्चमध्ये मंजुरी : उद्योगमंत्री सामंत

शिरोळ तालुक्यातील टाकळीवाडी, अकिवाट या दोन गावांत औद्योगिक वसाहत होण्यासाठी 15 दिवसांपूर्वी तत्त्वता मान्यता दिली आहे. याला मार्चमध्ये मंजुरी दिली जाईल, असे अश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले.

राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना छत्रपती शिवरायांची प्रतिमा देऊन सत्कार केला. शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह माने-पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर, राजेश क्षीरसागर, संजय पाटील-यड्रावकर, प्रकाश पाटील-टाकवडेकर, प्रताप पाटील, सुभाषसिंह रजपूत, अनिलराव यादव, रामचंद्र डांगे, रवींद्र माने, सतीश मलमे, उदय झुटाळ, सुरेश शहापुरे आदी प्रमुख्याने उपस्थित होते.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button