भरधाव कारने समोरासमोर धडक दिल्याने दुचाकीवरील दोन तरुण जागीच ठार
बीड: भरधाव कारने समोरासमोर धडक दिल्याने दुचाकीवरील दोन तरुण जागीच ठार झाले. ही धक्कादायक घटना बीड-परळी मार्गावरील मौज येथे (दि.२८ ऑगस्ट) रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली.
पोलिसांच्या माहितीनुसार, दुचाकी (एमएच ४४ ई- ९८५२) वरुन दोन तरुण बीडहून वडवणीकडे जात होते तर कार (एमएच ०४ जीडी- ४६०५ ) वडवणीहून बीडकडे जात होती. मौज शिवारात दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. यात दुचाकीवरील अंदाजे २५ ते ३० वर्षे वयाचे दोन्ही तरुण जागीच ठार झाले. अपघातात दुचाकीचा चक्काचूर झाला असून कारचेही नुकसान झाले.
दरम्यान, अपघातानंतर स्थानिकांनी धाव घेतली. कारचालक जखमी असून त्याला बीड येथे खासगी दवाखान्यात दाखल केले आहे. पिंपळनेर ठाण्याचे सहायक निरीक्षक बाळासाहेब आघाव यांनी धाव घेतली आणि कार ताब्यात घेऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे.