ताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचेसंपादकीय

कितीही केलं तरी सुखाचा आणि समाधानाचा शोध काही थांबत नाही..


आपल्याकडे तर लग्न करताना (अरेंज मॅरेज) मुख्यत्वे मुलाची आर्थिक परिस्थिती बघितलेली असते. मुलाकडे, त्याच्या कुटुंबाकडे पैसाआडका, घरदार आहे हे बघून लग्न लावलेलं असतं. नव्याची नवलाई संपली की अपेक्षांचा खेळ सुरू होतो. परदेशी दौरे, मनात येईल तेव्हा शॉपिंग, किटी पार्ट्या, भिशा यांची गंमतही संपून जाते. मजा येत नाही. मग ओढ लागते सहवासाची. गरजा फक्त आर्थिक उरत नाहीत. दोघांनीच कुठेतरी निवांत फिरायला जावं, एकमेकांशी हितगुज करावं, घराबाहेरच्या मोठ्या लॉंनवर हातात हात घालून चालावं, पावसात भिजावं, टपरीवर चहा प्यायला जावं, एखाद्या मरगळलेल्या रविवारी सकाळी गादीत लोळत पडावं.. असलं काहीबाही वाटायला लागतं. पैसे कमावण्याच्या धुंदीत ‘तो’ मात्र इतका मश्गूल असतो की कालपर्यंत बायकोच्या डोक्यातही नसलेल्या या अपेक्षा आज अचानक उगवलेल्या आहेत हे त्याच्या लक्षातच येत नाही.

आणि मग तिची कुरकुर सुरू होते, तू मला समजून घेत नाहीस. पण समजून घ्यायचं म्हणजे नक्की काय करायचं हे नवऱ्याला तिलाही स्पष्ट शब्दात सांगता येत नाही. ती सांगतही नाही. आणि नाखूश होते. स्वत:वर. त्याच्यावर. आर्थिक सुखाचाही तिला कंटाळा येतो. लहानसहान गोष्टीत दडलेला आनंद घेऊ बघते. पण त्यावेळी तो त्या मोडवर नसतो आणि मूडमध्येही नसतो. आणि मग तिला सुख बोचायला लागलं असं तिला, त्याला आणि इतरांनाही वाटू लागतं.

त्या दोघांच्या घरात पैसा असतो. आर्थिक विवंचना नसतात. पण परस्परांविषयी आदर नसतो. न तिला त्याच्याबद्दल, ना त्याला तिच्याबद्दल. देहकर्म गरजेपुरते उरलेले असतात. त्यात ना आनंदाचा शोध असतो, ना एकमेकांना सुखावण्याची ओढ. सगळंच कोरडं पडलेलं. मग सुख येणार कुठून? अपमानित आणि अनादराचं जीणंच आपल्या वाट्याला येतं असं अनेकींच्या मनात असतं. पण तरी त्या नात्यात सुख शोधणाऱ्या बायकाही आजूबाजूला दिसतात. चार घरं, पाच गाड्या आणि बॅँकबॅलन्स असूनही सतत दुखावलेल्या. किटी पार्ट्यांमध्ये, देवा-धर्मात, नात्यागोत्यात समाधान शोधणाऱ्या. काहींना जडतात काहीबाही आजार. आज काय हेच दुखतंय, उद्या काय तेच दुखतंय. हा डॉक्टर आणि तो वैद्य. मनाच्या दुखण्याला शरीराचे उपचार काय कामाचे? पण हे ना त्यांच्या लक्षात येतं ना नवऱ्याच्या. पैसा पुरवून आपण आपलं कर्तव्य पार पाडतोय हा नवऱ्याला विश्वास असतो. आणि रोज नव्या डॉक्टरकडे जाऊन आपल्या असमाधानाचं कारण शोधण्यात बायको मश्गूल. यात सहजीवन असतं कुठे? खरंतर असते अपेक्षा, पैशापलीकडच्या सुखाची. आनंदाची. पण तो गवसत नाही. आणि सहजीवनात ती दु:खी बनते.

तरीही बायका नाती निभावून नेतात. ओढून नेतात. कारण जे काही आहे त्यातली सुरक्षितता त्यांना हवीहवीशी वाटत असते. मुलाचं भवितव्य हाही मुद्दा असतोच.

स्त्रीला नेमकं काय हवं असतं हा तसा सनातन प्रश्न. तिला अर्थातच सगळं हवं असतं. पैसा हवा असतो, स्पेस हवी असते, तिचं हळवेपण त्यानं जपणं हवं असतं, तिचं स्वातंत्र्य हवं असतं, त्या स्वातंत्र्याचा स्वीकार त्यानं करायलाच हवा असतो, तिच्या बदलणाऱ्या आनंदाच्या कल्पना समजून घेणं हवं असतं. अर्थात तिलाच का हे सारं पुरुषाच्या बाबतीतही असतं. त्याच्याकडेही अशीच एक मोठी लिस्ट असते. बायकोनं समजून घ्यावं अशी त्याचीही अपेक्षा असतेच. पण दोघांच्याही अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत की ते असमाधानी राहतात. नाती फक्त निभावून न्यायला लागतात. बारकाईनं विचार केला तर लग्न व्यवस्था आपल्याला एक अशा नात्यात ढकलते जिथं सगळ्या आपल्या साऱ्या अपेक्षा आणि गरजांची पूर्तता एकाच व्यक्तीनं करावी अशी ‘अपेक्षा’ असते. आणि काहीशी सक्तीही.
आपला जोडीदार आपल्या अनेक गरजा आणि अपेक्षा पूर्ण करू शकत नाही हे लक्षात आलं की मग आहे त्यात समाधान शोधण्याचा प्रयत्न सुरु होतो. ज्यांना तेही जमत नाही त्या / ते कुरकुऱ्या बनतात. अपेक्षाभंगाच्या वर्तुळाभोवती फिरत राहतात, किंवा त्यांच्या त्यांच्या परीनं उत्तरं शोधतात. अपेक्षांच्या डोंगरावर बसण्यापेक्षा आपलं जगणं शोधतात, मन रमवतात, उत्तरं गवसून नव्या गोष्टींशी मैत्र जोडतात.
आणि हे सारं कितीही केलं तरी सुखाचा आणि समाधानाचा शोध काही थांबत नाही..

– मुक्ता चैतन्य


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button