गेले त्यांची पर्वा करू नका. शिवसैनिक आपल्यासोबत आहेत. जनतेची कामे करणे हा शिवसैनिकांचा धर्म आहे. तेव्हा जनतेची कामे करीत राहा. सामाजिक बांधिलकी सोडू नका. आपापला वॉर्ड पिंजून काढा.
महापालिका निवडणुका आपण जिंकणारच. त्यासाठी तयारीला लागा, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज माजी नगरसेवकांना दिले.
शिवसेना भवन येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माजी नगरसेवकांची बैठक घेतली. या बैठकीविषयीची माहिती माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रसारमाध्यमांना दिली. शिवसेनेची बांधिलकी ही जनतेशी आहे. त्यामुळे आजही सर्वसामान्य जनता आपले प्रश्न घेऊन शिवसेनेकडेच येत आहे. देशभरात राजकीय घडामोडी घडताहेत, त्याकडेच अनेकांचे लक्ष आहे; पण आपल्यासाठी जनतेची कामे महत्त्वाची आहेत हे लक्षात ठेवा, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बजावले.
आमिषे दाखवली जातील, पण शिवसेनेने दाखवलेल्या वाटेवर चालत राहा
अनेकांना फोन येताहेत, काहींच्या भेटीगाठीही वाढल्यात. त्यामुळे कुणी इकडे राहा आणि तिकडे जा यासाठी मी कुणालाही जबरदस्ती करणार नाही. आमिषे दाखवली जातील, पण शिवसेनेने दाखवलेल्या वाटेवर चालत राहा. जनतेशी आपली बांधिलकी आहे, तेव्हा जनतेमध्ये जा आणि त्यांची कामे करा, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज माजी नगरसेवकांना दिले.
जनतेच्या कामात कुचराई करू नका!
मलेरियाचे पेशंट वाढताहेत, स्वाइन फ्लू वाढतोय. दिल्लीत मास्क लावण्यास सुरुवात झाली आहे. जे घडतंय ते सर्वांसमोर आहे. त्याला आपण सर्वजणच सामोरे जातोय. जनतेविषयीची जी तुमची बांधिलकी आहे त्यात कुठेही कुचराई करू नका. तुम्ही तुमची कामे करत राहा, असे निर्देश उद्धव ठाकरे यांनी दिल्याचे किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.