दारूचा ग्लास सांडला म्हणून खुन

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


पिंपरी : दोघेजण एकत्र दारू पीत असताना एकाकडून दारूचा ग्लास सांडला. त्यामुळे त्याला काठीने व दारुच्या बाटलीने तोंडावर व डोक्यावर मारले. यात त्याचा मृत्यू झाला. त्यांनतर मृतदेह कचऱ्याच्या गाडीत टाकून महाळुंगे गावाजवळ रस्त्याच्या बाजूला टाकला.

प्रकरणातील दोघांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली.

नीलेश सतीश धुमाळ, राजेंद्र थोरात अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मयताची पूर्ण ओळख अद्याप पटलेली नाही. त्याचे नाव बालाजी असून तो नांदेड येथील असल्याचे तपासातून समोर आले आहे. बालाजी हा पिंपरी-चिंचवड परिसरात फिरस्ती होता.

पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ जुलै रोजी सायंकाळी माण-महाळुंगे रस्त्याच्या बाजूला कचऱ्यात एक अनोळखी मृतदेह आढळला. त्याची ओळख पटली नव्हती. डोक्यात मारून त्याचा खून केल्याचे शवविच्छेदन अहवालात उघड झाले. त्यात खुनाचा गुन्हा दाखल करून तपासासाठी हिंजवडी पोलिसांची दोन पथके तयार केली. पथकांनी कौशल्याने तपास करून आरोपी निष्पन्न केले.

आरोपी नीलेश आणि मयत हे एकत्र दारू पीत होते. बालाजीकडून नीलेशचा दारूचा ग्लास सांडला. त्या कारणावरून नीलेशने काठीने, दारूच्या बाटलीने तोंडावर, डोक्यावर तसेच शरीराच्या विविध भागात मारहाण करून बालाजीचा खून केला असल्याचे आरोपीने पोलीस तपासात सांगितले.