ताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्रमुंबईराजकीय

महाविकासआघाडी सरकारने घेतलेला निर्णय रद्द 2017 प्रमाणेच 227 वॉर्डांची रचना


शिंदे सरकारने मुंबई तसंच इतर महापालिकांच्या सदस्य संख्येतही सुधारणा केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या या निर्णयामुळे काँग्रेस मात्र चांगलीच खूश झाली आहे. सरकारचा हा निर्णय म्हणजे मुंबईचा विजय असल्याची प्रतिक्रिया मुंबई काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांनी दिली आहे. तसंच देवरा यांनी शिवसेनेवरही निशाणा साधला आहे.

शिवसेनेने शिवसेनेसाठी घेतलेला हा निर्णय आता इतिहास असल्याची टीका देवरा यांनी केली आहे. काँग्रेसला जाणूनबुजून लक्ष्य करण्यासाठी आणि महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसला साफ करण्याची ही रणनिती अयशस्वी ठरल्याचंही देवरा म्हणाले. ‘शिवसेनेने यावर्षाच्या सुरुवातीला घेतलेला मुंबई महापालिकेच्या फेररचनेचा निर्णय महाराष्ट्र सरकारने रद्द केला. या फेररचनेमुळे मुंबईत काँग्रेसचं नुकसान होणार होतं.

काँग्रेसने अनेकवेळा याला विरोध केला तरीही त्याकडे लक्ष दिलं गेलं नाही. आता सरकारने याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, याबाबत मी महाराष्ट्र सरकारचं कौतुक करतो. निवडणूक आयोगाने वॉर्ड-निहाय आरक्षण पारदर्शकरित्या करावं. काँग्रेस न्याय, सर्वसमावेशकता, लोकशाही आणि चांगल्या शासनासाठी कायमच लढत राहिल,’ असं वक्तव्य मिलिंद देवरा यांनी केलं आहे.

वॉर्ड रचनेमध्ये सुधारणा केल्यामुळे आता महापालिकेत 236 सदस्यांऐवजी 227 सदस्यसंख्या होईल. महाविकासआघाडी सरकारने केलेल्या वॉर्ड पुर्नरचनेमुळे मुंबई महापालिकेची संख्या 236 झाली होती. या पुर्नरचनेवर काँग्रेससह भाजपनेही आक्षेप घेतला होता, एवढच नाही तर काँग्रेसने याविरोधात कोर्टातही याचिका दाखल केली होती. काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी कालच मुंबईतल्या काही काँग्रेस नेत्यांबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटही घेतली.

या भेटीमध्ये देवरा यांनी वॉर्डच्या फेररचनेबाबत काँग्रेसची नाराजी बोलून दाखवली, त्यानंतर आज लगेचच शिंदे आणि फडणवीस यांनी महाविकासआघाडी सरकारची वॉर्ड फेररचना रद्द केली. महाविकास आघाडी सत्तेत असताना प्रभाग रचनांच्या मुद्द्यावरुन शिवसेना-काँग्रेसमध्ये वाद झाला. काँग्रेस नेत्यांनी प्रभाग रचनेवरुन शिवसेनेवर टोकाची टीका केली होती. विशेष म्हणजे काँग्रेस नेत्यांनी प्रभाग रचनेच्या मुद्द्यावरुन न्यायालयाची देखील पायरी चढली होती. आता शिंदे-फडणवीस सरकारने घेतलेल्या या निर्णयाचं काँग्रेसने स्वागत केल्यामुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना महाविकासआघाडीमध्ये एकाकी पडल्याचं चित्र आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button