महाराष्ट्रराजकीय

अजितदादांचा पारा चढला; काय म्हणाले, ‘चंद्र-सूर्य आहेत, तोपर्यंत कुणी मायचा लाल…’


देशभरात 400 हून अधिक जागा मिळाल्या तर संविधान बदलले जाईल, असे जाहीर विधान कर्नाटकातील भाजपच्या एका नेत्याने केले होते. तोच धागा पकडून काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसह विरोधकांनी भाजपवर सडकून टीका केली आहे.



भाजपला विकासासाठी नाही तर संविधान बदलण्यासाठी एकहाती सत्ता पाहिजे, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. विरोधकांच्या या टीकेचा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शेलक्या शब्दांत समाचार घेतला आहे. Ajit Pawar News

परभणी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार, रासपचे अध्यक्ष महादेव जानकरांच्या (Mahadev Jankar) प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. त्यावेळी पवारांनी विरोधकांवर सडकून टीका केली. ते म्हणाले, आज विरोधकांना बोलण्यासाठी मुद्दा राहिलेला नाही. त्यांच्याकडून लोकाची दिशाभूल करण्याचे काम सुरू असल्याची टीका केली.

गेल्या दहा वर्षांत पंतप्रधान मोदींच्या (Narendra Modi) नेतृत्वात देशात मोठ्या प्रमाणात विकासकामे झालेली आहेत. त्यापूर्वी एवढी कामे कधीही झालेली नव्हती. त्यांचे उद्याच्या दहा वर्षांचे व्हिजनही ठरलेले आहे. विरोधक मात्र भाजप 400 पार गेले, तर संविधान बदलतील, असा प्रचार करत आहेत. मात्र, जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत, तोपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान कुणी मायचा लाल बदलू शकत नाही, असे पवारांनी ठासून सांगितले.

प्रत्येकवेळेस निवडणुका आल्या की, संविधान बदलणार असा अपप्रचार केला जातो. घटना बदलणार, भविष्यात निवडणुकाच होणार नाहीत, अशी काही बेताल वक्तव्ये विरोधक करतात. त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. त्यात अजिबात तथ्य नाही. अल्पसंख्याक समाजानेही अजिबात काळजी करू नये. आम्ही सर्वजण तुम्हाला आधार देऊ. सर्वांना गुण्यागोविंदाने राहता येईल, यासाठी प्रयत्न करू. राज्यातील सामाजिक सलोखा राखण्यासाठी आम्ही जिवाचे रान करू. आम्ही कुठेतरी एकटे पडलो आहोत, अशी भावना मनामध्ये आणू नका, असेही पवारांनी (Ajit Pawar) आश्वासित केले.

आता महादेव जानकर हे परके म्हणून सांगितले जात आहेत. मात्र, विकासासाठीच ते परभणीतून लढत आहेत. मागे दहा वर्षे ज्यांना निवडून दिले त्यांच्यापेक्षाही जास्त विकास जानकर करतील. त्यांना केंद्रासह राज्याचा पाठिंबा असेल, असा विश्वासही पवारांनी दिला. यासह त्यांनी राष्ट्रवादीकडून इच्छुक राजेश विटेकरांनाही शब्द दिला. पवार म्हणाले, वरिष्ठ पातळीवर निर्णय झाला आणि विटेकरांना थांबायला सांगावे लागले. मात्र, विटेकरांना सहा महिन्यांतच विधिमंडळाचे सदस्य केल्याशिवाय राहणार नाही, असे आश्वासनही अजित पवारांनी परभणीकरांना दिले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button