मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात 6 ते 8 जुलै हे तीन दिवस मुसळधार पाऊस

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


मुंबई : मुंबईसह संपूर्ण कोकणात पावसाचे धूमशान सुरू असून, तुंबलेल्या मुंबईत मंगळवारी वाहने रखडली, लोकल मंदावली आणि पावसाच्या रुद्रावतारामुळे शाळांना सुट्टी द्यावी लागली.
कोकणात जगबुडी, वाशिष्टी, शास्त्री, जानवी या नद्यांनी इशारा पातळीही ओलांडली असून, संपूर्ण कोकणात 3500 लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. त्यातच आता मुंबईसह कोकणला अतिमुसळधार रेड अलर्ट देण्यात आला आहे.

गुजरात ते महाराष्ट्राची किनारपट्टी आणि पूर्व राजस्थानपासून मध्य प्रदेशपर्यंतच्या भागात दोन कमी दाबाचे पट्टे तयार झाल्यामुळे कोकणसह कोल्हापूर व सातारा या भागात अतिमुसळधार (रेड अलर्ट) पावसाचा इशारा देण्यात आला असून, मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात 6 ते 8 जुलै हे तीन दिवस मुसळधार पाऊस होणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

या पावसाने सर्वात हाहाकार उडवला तो पूर्व उपनगरांमध्ये. कुर्ला आणि चेंबूरमध्ये पाणीच पाणी झाले आणि ते पोस्टल कॉलनीत शिरल्याने तेथील रहिवाशांना घरे-दारे सोडून दुसरीकडे आश्रय घ्यावा लागला.

कोकणात गेल्या तीन ते चार दिवसांपासून अतिमुसळधार पाऊस कोसळत असल्याने अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला आणि कोकणच्या बहुतांश भागात गावागावांत पुराचे पाणी शिरले आहे. मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा आणि विदर्भातही अतिवृष्टी झाली आहे.