खेळताज्या बातम्या

वर्ल्डकपमध्ये तिलक वर्माला संधी मिळणार का? रोहित शर्माचे मोठे विधान; म्हणाला, “मी त्याच्याबद्दल आता एवढेच सांगेन.”


वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी२० मालिकेत पदार्पण करणाऱ्या तिलक वर्माच्या फलंदाजीवर सर्वजण खूश आहेत. त्याच्या सर्वोत्तम कामगिरीने सर्वांनाच प्रभावित केले. याबरोबरचं त्याच्या टी२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचीही उत्तम सुरुवात झाली आहे.



आता तिलकने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाचव्या आणि शेवटच्या टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात आपल्या नावावर एक विशेष विक्रम नोंदवला. २० वर्षीय तिलकने १८ चेंडूंत ३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने २७ धावांची खेळी केली. त्याने भारताचा कर्णधार रोहित शर्माचा एक अनोखा विक्रम मोडला आहे.

तिलक वर्मा हा २० वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयात भारतीय क्रिकेट संघासाठी टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरला आहेत. त्याचबरोबर तिलक वर्माने टी२० मध्ये आतापर्यंत ७ षटकार मारले आहेत. याआधी हा विक्रम भारतीय कर्णधार आणि स्टार फलंदाज रोहित शर्माच्या नावावर होता, ज्याने या फॉरमॅटमध्ये २० वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयात ४ षटकार ठोकले होते.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी२० मालिकेत पदार्पण करणाऱ्या युवा फलंदाज तिलक वर्माची कामगिरी उत्कृष्ट ठरली आहे. तसेच, तिलक वर्मा भारत विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्या पाच सामन्यांच्या टी२० मालिकेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. त्याने ५ डावात ५७.६७च्या सरासरीने १७३ धावा केल्या.

भारताने वेस्ट इंडिजविरुद्धची टी२० मालिका गमावली

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांची टी२० द्विपक्षीय आंतरराष्ट्रीय मालिका संपुष्टात आली आहे. या मालिकेत वेस्ट इंडिजकडून चांगली कामगिरी पाहायला मिळाली. वेस्ट इंडिजने मालिकेतील पहिला आणि दुसरा सामना जिंकला, त्यानंतर भारताने शानदार पुनरागमन करत तिसरा आणि चौथा सामना जिंकला. मात्र, मालिकेतील अंतिम सामन्यात वेस्ट इंडिजने टीम इंडियाचा ८ विकेट्सने दारूण पराभव करत मालिका ३-२ने जिंकली. मालिका जरी टीम इंडियाने गमावली असली तरी त्यात अनेक युवा खेळाडूंनी अफलातून कामगिरी केली. यामुळे २०२४ साली होणारा आगामी टी२० विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून याच खेळाडूंना संघात स्थान मिळण्याची संधी अधिक निर्माण झाली आहे, ही बाब भारतीय संघासाठी खूप महत्वाची आहे.

२०२३च्या विश्वचषकात तिलक वर्माला संधी मिळेल का? रोहित शर्माचे मोठे विधान

वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी२० मालिकेत युवा फलंदाज तिलक वर्माने आपल्या खेळाने खूप प्रभावित केले आहे. तिलक वर्मा याच्या कामगिरीनंतर त्यांना विश्वचषक २०२३च्या संघात चौथ्या क्रमांकावर संधी द्यावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, रोहित शर्माने तिलक वर्मा याच्याशी संबंधित प्रश्नाला उत्तर देताना त्याचे कौतुक केले आहे.

रोहित शर्माने मीडियाशी संवाद साधताना सांगितले की, “मी त्याला दोन वर्षांपासून पाहत आहे, त्याला धावांची भूक आहे आणि ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. त्यात मी भारताचा सुपरस्टार बघू शकतो कारण की, तो वयाने लहान आहे पण फलंदाजीत तो परिपक्व खेळाडू वाटतो. जेव्हा मी त्याच्याशी बोलतो तेव्हा मला समजते की, डाव कसा सावरायचा हे त्याला माहित आहे. सामन्यातील परिस्थिती बघून कशी फलंदाजी करायची, कुठे फटके मारायचे? हे त्याला माहित आहे.”

रोहित पुढे म्हणाला, “मी त्याच्याबद्दल आता एवढेच सांगेन की, विश्वचषकात त्याची निवड होणार की नाही याबाबत मला काहीही माहिती नाही, परंतु निश्चितच तो प्रतिभावान खेळाडू आहे आणि त्याने भारतासाठी खेळलेल्या या काही सामन्यांमध्ये ते दाखवून दिले की, तो टीम इंडियाचा प्रमुख फलंदाज होऊ शकतो.”


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button