ताज्या बातम्या

भंडारदरा वर्षा महोत्सवाला स्थानिकांचा विरोध, गावकऱ्यांना ऐनवेळी निमंत्रण, दुसऱ्याच गावची जाहिरात


अहमदनगर : भंडारदरा धरण परिसरातील (Bhandardara Dam) पर्यटनस्थळांचा आनंद घेण्यासाठी दरवर्षी पावसाळ्यात मोठी गर्दी होते. त्यामुळे महाराष्ट्र पर्यटनसंचलनालयाकडून वर्षा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

मात्र स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात न घेता थेट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याने व कार्यक्रमाच्या दिवशीच ग्रामस्थांकडून ना हरकत दाखला घेण्यात आल्याचा प्रकार देखील समोर आला आहे.

अहमदनगर(Ahmednagar) जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील (Akole) भंडारदरा परिसरात वर्षा महोत्सावाचे आयोजन शासनाच्या (Maharashtra Tourism) पर्यटन विभागाच्या वतीने करण्यात आले होते. आदिवासी बांधवांना रोजगार मिळावा आणि पर्यटनाला चालना मिळावी, या उद्देशाने हा महोत्सव भरविण्यात आला होता. मात्र ज्या भंडारदरा ग्रामपंचायत (Bhandardara Grampanchayat) आणि ग्रामस्थ यांना विश्वासात न घेता परस्पर नियोजन करता कार्यक्रमाच्या उदघाटनाच्या एक दिवस आधी ना हरकत मिळण्यासाठी अर्ज देण्यात आला. महाराष्ट्र पर्यटन संचलनालयामधील असमन्वयामुळे सर्व महोत्सवावर पाणी फिरले असून कार्यक्रमाच्या नियोजनावर राज्य शासनाने केलेला लाखो रुपयांचा खर्च देखील वाया गेला आहे.

निसर्गांचं सौंदर्य लाभलेल्या भंडारदरापरिसरात पावसाळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. पर्यटनाला चालना मिळावी या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचनालयाच्या वतीने 12 ते 16 ऑगस्ट या कालावधीत भंडारदरा वर्षा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते उदघाटन सोहळा पार पडणार होता. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी राज्य शासनाचे लाखो रुपये खर्ची झाले आहेत. मात्र ज्या ग्रामपंचायत हद्दीत का कार्यक्रम पार पडणार होता, त्यांना थेट कार्यक्रमाच्या दिवशीच माहिती देत ना हरकत मिळण्यासाठी अर्ज केला गेला. भंडारदरा ग्रामस्थांना विश्वासात न घेता पर्यटन संचनालय विभागाने कार्यक्रमाचे नियोजन केले. त्यामुळे या नाराजीचा फटका वर्षा महोत्सवाला बसला असून लाखो रुपयांचा खर्च वाया गेला आहे. पर्यटन संचनालयाचे अधिकारी दुजाभाव करत असल्याचा आरोप भंडारदरा ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थांनी केला आहे.

दुसऱ्याच ग्रामपंचायतच्या नावाने जाहिरातबाजी

ज्या ग्रामपंचायतमध्ये कार्यक्रम त्याऐवजी दुसऱ्याच ग्रामपंचायतच्या नावाने जाहिरातबाजी करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तर लाखो रुपये खर्च करून उभारलेला मांडव रिकामाच असून स्टॉलसाठी कोणीही पुढे न आल्याने पर्यटन विभागाच्या कामकाजावर टीका होत आहे. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटनस्थळांवर पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे, अशातच महाराष्ट्रातील पर्यटनाचं केंद्र असलेल्या भंडारदरा धरण परिसरात पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याच्या भंडारदरा धरण परिसरात रंधा धबधबा, नेकलेस फॉल, भंडारदरा धरण, अम्ब्रेला फॉल अशी विविध पर्यटनस्थळं आहेत.

 

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button