ताज्या बातम्यामहाराष्ट्र

आमदाराची आई महाकालीच्या यात्रेत विकते बांबूच्या टोपल्या


चंद्रपूर: आपल्या राज्याच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांपासून “50 खोके एकदम ओके” हा शब्द फार प्रचलित झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांसाठी विरोधक सातत्याने हा शब्द वापरतात.
मात्र मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत गेलेल्या एका आमदाराची आई आजदेखील रस्त्यावर बसून बांबूच्या टोपल्या विकते हे जर तुम्हाला सांगितलं तर विश्वास बसणार नाही.



चंद्रपूर शहरात सध्या माता महाकालीची यात्रा सुरु आहे. या यात्रेत एक रस्त्याच्या कडेला बांबूच्या टोपल्या विकणारी आजीबाई सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत. ही वृद्ध स्त्री एखादी सामान्य कष्टकरी महिला वाटेल. मात्र यांची यांची दुसरी ओळख देखील आहे. चंद्रपूर मतदारसंघाचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या त्या मातोश्री आहेत. गंगुबाई जोरगेवार उर्फ सर्वांच्या परिचयाच्या असलेल्या अम्मा.. अम्मांच वय 80 वर्ष आहे. मात्र त्यांची आपल्या कामावर असलेली श्रध्दा पाहून तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल. खरं तर मुलगा आमदार झाल्यावर सुखात घरी बसून राहायचे दिवस आहेत. मात्र वार्धक्य आले तरी आपला व्यवसाय नेटाने चालविणाऱ्या गंगुबाई यंदाही देवी महाकाली यात्रेत आपला व्यवसाय समर्थपणे करत आहेत.

अम्मा चंद्रपूरच्या मुख्य बाजारपेठेत म्हणजे गांधी चौकात वर्षभर रस्त्याच्या कडेला बसून बांबूच्या वस्तू विकतात. मात्र महाकालीच्या यात्रेदरम्यान चांगली विक्री होते. म्हणून यात्रेत देखील न चुकता आपला व्यवसाय थाटतात. ग्राहकांशी तीच घासाघीस तेच सौदे आणि त्यानंतर श्रद्धेने देवी दर्शनासाठी आलेल्या भाविकांना चंद्रपूरच्या बांबूच्या टोपल्या देण्यात त्या आनंद शोधत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या आमदार मुलाला देखील आपल्या आईच्या या कामाचं कौतुकच आहे. बांबू ताटवे, टोपल्या याचा पिढीजात धंदा करणारे जोरगेवार कुटुंब आजही आपल्या व्यवसायावर ठाम आहेत. तेच श्रम- तोच व्यवसाय- तेच कष्ट आणि तोच आनंद मिळवत आहे.

किशोर जोगरेवार 2019 साली जेव्हा आमदार बनले तेव्हाही गंगूबाईंनी आपण आपला पिढीजात व्यवसाय सोडणार नसल्यानं माझाला सांगितलं होतं. काही दिवसांपूर्वी राज्यात सत्तांतर झालं आणि जोरगेवारांनी आपलं दान शिंदेंच्या पारड्यात टाकलं. तेव्हापासून त्यांचे विरोधक, त्यांच्यावर खोके घेतल्याचा आरोप करतात पण आपल्या आईच्या कष्टाचा दाखला देत त्यांनी हे सगळे आरोप फेटाळले आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यातील याच मातीतले ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांनी “श्रम ही है श्रीराम हमारा” हा नारा दिला होता. त्याच जिल्ह्यातल्या अम्मांनी हा नारा आयुष्यभर जपला आहे. लोकप्रतिनिधीचं कुटुंब कसं असावं… याचा हा आदर्श नमुनाच म्हणावा लागेल.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button