क्षणात होत्याचं नव्हतं झालं! १५० रुपयांची कार्बाइड गन बेतली जीवावर, १२५ जणांनी गमावली दृष्टी…

भोपाळमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. १५०-२०० रुपयांच्या कॅल्शियम कार्बाइड गनमुळे अनेक लहान मुलं आणि तरुणांच्या डोळ्यांना मोठा फटका बसला आहे. त्यांनी दृष्टी गमावली आहे. रुग्णालयाच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत १२५ हून अधिक लोकांना याचा त्रास झाला आहे.
बहुतेक रुग्ण ८ ते १४ वयोगटातील मुलं आहेत. तसेच अनेक तरुणांनाही याचा फटका बसला आहे.
गन गॅस लाईटर, प्लास्टिक पाईप आणि सहज उपलब्ध असलेल्या कॅल्शियम कार्बाइडपासून बनवली जाते. पाईपमधील कॅल्शियम कार्बाइड पाण्यात मिसळल्यावर एसिटिलीन गॅस तयार होतो. एक लहान ठिणगी भीषण स्फोट घडवते आणि पाईप फुटल्यावर बाहेर पडणारे प्लास्टिकचे छोटे तुकडे शरीरात, विशेषतः डोळ्यांत प्रवेश करू शकतात, ज्यामुळे गंभीर दुखापत होते. ज्यामुळे चेहरा, डोळे आणि कॉर्नियाचं गंभीर नुकसान होते.
भोपाळच्या रुग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांच्या रिपोर्टवरून असं दिसून येतं की शेकडो रुग्णांपैकी २०-३० टक्के रुग्णांना गंभीर दुखापत झाली आहे. अनेकांना तात्काळ शस्त्रक्रिया करावी लागली आणि काही प्रकरणांमध्ये कॉर्नियल प्रत्यारोपणाचीही आवश्यकता होती. किरकोळ भाजलेल्यांना मलमपट्टी करून घरी पाठवण्यात आले आहे, परंतु अधिक गंभीर प्रकरणांसाठी ऑपरेशन्स आणि फॉलोअपची तयारी सुरू आहे.
नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अदिती दुबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आमच्याकडे ७ वर्षांच्या ते ३५ वर्षांच्या वयोगटातील लोक आले आहेत. या दिवाळीत कार्बाइड बॉम्बमुळे विशिष्ट प्रकारची दुखापत झाली आहे. अनेक प्रकरणांमध्ये, केमिकलच्या वापरामुळे डोळ्यांची जळजळ झाली. २० ते ३० टक्के लोकांचं गंभीर नुकसान झालं आणि त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. किरकोळ भाजलेल्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले.











