भडारा : (आशोक कुंभार )भंडारा जिल्ह्याच्या परसोडी बिटातील टी -13 वाघाच्या मृत्यू प्रकरणी तीन गुराख्यांना अटक करण्यात आली आहे. चौकशीदरम्यान 7 वाघ नखे, एक मणक्याचे हाड, एक पायाचे हाड व अन्य वाघाचे अवयव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अटक झालेल्यांमध्ये लाखनी (Lakhani) तालुक्यातील नरेश गुलाबराव बिसने (54), मोरेश्वर सेगो शेंदरे (64, दोन्ही रा. परसोडी), वशिष्ठ गोपाल बघेले (59, रा. खुर्शीपार- सालेभाटा) यांचा समावेश आहे. वाघाच्या मृत्यूचं गूढ उजेडात आल्यामुळे अनेकांना मोठा धक्का बसला आहे. त्याचबरोबर यानंतर असं कोणी कृत्य करणार नाही यासाठी जनजागृती सुद्धा करण्यात येणार आहे.
पशुधन विकास अधिकारी डॉक्टरांनी केलेल्या शवविच्छेदन अहवालातून विषप्रयोगाची बाब उघड होताच एकच खळबळ उडाली होती. तातडीने सहायक वनसंरक्षक यांनी तपास सुरू केला. 28 मार्च रोजी नरेश गुलाबराव बिसने व मोरेश्वर सेगो शेंदरे (दोन्ही रा. परसोडी) या गुराख्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. दरम्यान, 30 मार्च रोजी वशिष्ठ गोपाल बघेले (रा. खुर्शीपार ) यास चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यानंतर या प्रकरणाची उकल झाली आहे. आरोपीकडून एकूण 7 वाघ नखे, वाघाच्या मणक्याचे हाड, एक पायाचे हाड व अन्य साहित्य जप्त करण्यात आले असून आरोपींना न्यायालयीन कोठड़ी सुनावण्यात आली आहे.
शेतात अनेकदा वाघांचे दर्शन होत असल्यामुळे घाबरुन शेतकऱ्यांनी अनेकदा अशा पद्धतीचे प्रकार केले आहेत. त्याचबरोबर अशा गुन्हेगारांना शिक्षा देखील झाली आहे. सध्या शेतात अनेक जंगलातील प्राणी दिसत असल्यामुळे त्यांना तात्काळ ताब्यात घेण्याची मागणी शेतकरी वनविभागाकडे करीत आहेत. बिबट्याचं प्रमाण अधिक असल्यामुळे शेतकरी शेतात जाण्यास घाबरत आहेत.