ताज्या बातम्या

सध्या माझ्याकडे एवढे आमदार, खोचक उत्तर देत शरद पवारांनी सांगितला आकडा


जुलै महिन्याच्या सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून आमदारांचा एक मोठा गट अजित पवार यांच्यासोबत राज्य सरकारमध्ये सहभागी झाला होता. या फुटीला आता दीड महिना उलटत आला आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमधीलअजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्याकडे नेमके किती आमदार आहेत, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.



त्यातच अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील गुप्त भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीबाबत अधिकच संभ्रम वाढला आहे. दरम्यान, आज शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला असताना, तुमच्यासोबत नेमके किती आमदार आहेत, अशी विचारणा करण्यात आली. या प्रश्नाला शरद पवार यांनी त्यांच्या शैलीत खोचक उत्तर दिले.

शरद पवार म्हणाले की, माझ्यासोबत सध्या शून्य आमदार आहे. कसं आहे की, १९८० साली माझे ५४ आमदार निवडून आले होते. मी विरोधी पक्ष नेता होतो. तेव्हा अंतुले मुख्यमंत्री होते. मी १५ दिवसांसाठी इंग्लंडला गेलो. मात्र परत आलो तेव्हा माझ्यासह पाच जण उरले होते. पण त्यानंतर जी निवडणूक आली तेव्हा माझ्या पक्षाचे ६८ आमदार निवडून आले. तसेच मला सोडून गेलेले सर्वजण पराभूत झाले होते, अशी आठवणही शरद पवार यांनी सांगितली.

यावेळी अजित पवार यांच्यासोबत झालेल्या गुप्तभेटीबाबत शरद पवार म्हणाले की, ती भेट ही गुप्त भेट नव्हती. पवार कुटुंबात मी वडिलधारा असल्याने माझा सल्ला आजही घेतला जातो. अजित पवारांसोबतच्या त्या भेटीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. महाविकास आघाडीत माझ्याशिवाय काँग्रेस-ठाकरे गटाचा प्लॅन ही केवळ चर्चा आहे. पण प्रत्यक्षात अशी वस्तुस्थिती नाही. संजय राऊत यांनी त्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

शरद पवार पुढे म्हणाले की, देशाची सत्ता भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या हातात आहे. त्यांची भूमिका समाजात एकता टिकवून ठेवण्याची असली पाहिजे, पण ते लोकांमध्ये फूट पाडत आहेत. मोदी आणि भाजपाविरोधात जनमत तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे. देशभरात २ सभा घेणार आहे. बिहार आणि कर्नाटकात मी सभा घेईन, असेही शरद पवार यांनी यावेळी सांगितले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button