पन्नास हजार वर्षांनंतर किंवा खचितच दिसणारा धूमकेतू सी पाहण्याची संधी
एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोलअंतराळ विज्ञान केंद्रा तर्फे रविवारी (ता.२२) पहाटे धूमकेतू दुर्बिणीद्वारे पाहण्याची संधी मिळणार आहे. हा धूमकेतू पाहण्यासाठी शहराबाहेर जावे लागणार आहे. यासाठी स्वत:चे वाहन असणे आवश्यक आहे. इच्छुक खगोलप्रेमींनी पहाटे ३:३० पर्यंत हर्सूल टी पॉइंट येथे जमावे तसेच अधिक माहितीसाठी ९८५००८०५७७ या फोन नंबर वर संपर्क करावा, असे आवाहन केंद्र संचालक श्रीनिवास औंधकर यांनी केले आहे.
पन्नास हजार वर्षांनंतर किंवा खचितच दिसणारा धूमकेतू सी /२०२२ ई३ ( झेडटीएच) किंवा ग्रीन कॉमेट आपल्या आंतरिक सौरमालेला भेट देत असतो. हा धूमकेतू उघड्या डोळ्यांनी दिसू शकतो.
रविवारी (ता.२२) ही पर्वणी आहे. हा धूमकेतू दुर्बिणीद्वारे पाहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. रविवारी पहाटे हा धूमकेतू दिसणार आहे.
एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोलअंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, धूमकेतू सी/२०२२ ई३ (झेडटीएफ) अथवा ग्रीन कॉमेटचा शोध कॅलिफोर्नियात वाइड-फील्ड सर्वेक्षण कॅमेरा वापरून लावला होता.
हा धूमकेतू ५० हजार वर्षांनी किंवा साधारणपणे एकदाच आपल्या आंतरिक सौरमालेला भेट देतो. आता हा धूमकेतू उघड्या डोळ्यांनी पाहण्याची अत्यंत दुर्मिळ संधी आली आहे. या आधी जेव्हा धूमकेतू रात्रीच्या आकाशात दिसला तेव्हा आपला ग्रह हा ‘वैश्विक हिमयुगात’ होता. या नंतर तो पुन्हा अनंत काळासाठी अंतराळात लुप्त होणार असल्याने पुन्हा दिसणार नाही. आपल्या सौर मंडळाच्या उर्ट मेघाच्या दूर वरच्या प्रदेशात याचे अस्तित्व आहे.
हा धूमकेतू १२ जानेवारी रोजी सूर्याच्या सर्वांत जवळ होता. त्यानंतर आपल्या परतीच्या प्रवासात जाताना १ फेब्रुवारीरोजी पृथ्वीच्या अतिशय जवळ म्हणजे ०४.५ दशलक्ष किलोमीटर अंतरावर असणार आहे, मात्र, तो आता सूर्यापासून दूर जात असल्याने त्याची शेपटी ही कमीकमी होताना दिसेल.