ते पुन्हा एक दिवस जिवंत होतील?भविष्यात माणवाला पुन्हा जिवंत करण्याचं तंत्रज्ञान
वॉशिंग्टन : अमेरिकेतल्या अॅरिझोना शहरातल्या एका कंपनीनं अशा मृत व्यक्तींचं शव जतन करून ठेवलं आहे, की ज्यांच्या नातेवाईकांना ते पुन्हा एक दिवस जिवंत होतील, अशी आशा आहे.
अमेरिकेतल्या अल्कोर लाइफ एक्स्टेंशन फाउंडेशनने द्रवरूप नायट्रोजनने भरलेल्या टाक्यांमध्ये सुमारे 200 मानवी शरीरं क्रायोप्रिझर्व्ड (Cryopreserved) केली आहेत. या व्यक्ती भविष्यात पुन्हा जिवंत होण्याची अपेक्षा आहे. फाउंडेशनच्या म्हणण्यानुसार, अनेक असे रुग्ण आहेत जे कॅन्सर, एएलएस किंवा इतर आजारांनी ग्रस्त होते, ज्यावर सध्या कोणताही इलाज उपलब्ध नाही. संस्थेच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, भविष्यात वैद्यकीय तंत्रज्ञानासह आरोग्य मिळण्याच्या उद्देशाने सबफ्रीजिंग तापमानाचा वापर करून मृत्यूची प्रक्रिया थांबवून जीव वाचवण्यासाठी केलेला एक अभ्यास म्हणजे क्रायोनिक्स होय.
मृत्यूची प्रक्रिया थांबवण्यासाठी क्रायोनिक्स हा सर्वोत्तम मार्गांपैकी एक असल्याचं या संस्थेचं म्हणणं आहे. सर्वांत कमी वयाची रुग्ण या रुग्णांपैकी मॅथरिन नोवारतपोंग ही क्रायोजेनिकच्या मदतीनं गोठवलेली सर्वांत तरुण रुग्ण आहे. याविषयी अधिक माहिती देताना अल्कोर संस्थेचे माजी सीईओ मॅक्स मूर यांनी सांगितलं, की नोवारतपोंग ही थायलंडमधली एक लहान मुलगी असून तिला ब्रेन कॅन्सर अर्थात मेंदूचा कर्करोग झाला होता. तिचे आई-वडील दोघंही डॉक्टर होते.
तिच्या मेंदूवर अनेक वेळा शस्त्रक्रिया झाल्या; पण त्यांचा दुर्दैवानं काही उपयोग झाला नाही. त्यामुळे त्यांनी आमच्याशी संपर्क साधला. नोवारतपोंग प्रकरण हे अल्कोरच्या काही सार्वजनिक घडामोडींपैकी एक आहे.
सेलेब्रिटींनीही निवडला गोठवण्याचा पर्याय सेलेब्रिटींविषयी बोलायचं झालं तर, पॅरिस हिल्टनने क्रायोप्रिझर्व्हेशनसाठी नोंदणी केली आहे.
अमेरिका गॉट टॅलेंटच्या सायमन कोल्डवेलने 2011 मध्ये सदस्यत्व जाहीर केलं होतं. परंतु नंतर तो बाहेर पडला. सध्या वॉल्ट डिस्नेच्या सदस्यत्वाविषयी अफवा पसरल्या आहेत; पण त्यांच्या कुटुंबीयांनी या अफवा फेटाळून लावल्या आहेत. तसंच महान बेसबॉल प्लेअर टेड विलियम्स यांचा 2002 मध्ये मृत्यू झाला होता.
सध्या ते अल्कोरमधल्या रुग्णांमध्ये समाविष्ट आहेत. भविष्यातलं वैद्यकशास्त्र मूर यांनी सांगितलं, की क्रायोनिक्सचा आपत्कालीन उपचार म्हणून विचार केला जातोय. रुग्णाची केवळ विल्हेवाट लावण्यापेक्षा त्याला आमच्याकडे सोपवा, असं आम्ही सांगत आहोत. भविष्यात त्यांना पुन्हा जिवंत करण्याचं तंत्रज्ञान विकसित होईल, तोपर्यंत ही कंपनी त्यांचं शरीर खराब होण्यापासून वाचवेल.
कंपनीच्या संस्थापकाच्या पत्नीलाही गोठवलं जाणार मॅक्स मूर यांची पत्नी नताशा वीटा-मूर यांनी देखील `न्यूरोसस्पेंडेड` होण्यासाठी करार केला आहे. याचा अर्थ त्यांचा केवळ मेंदू क्रायोप्रिझर्व्ह होणार. भविष्यात जेव्हा या व्यक्ती पुन्हा जिवंत होतील तेव्हा त्या आपले नातेवाईक आणि मित्रांना भेटू शकतील, असं कंपनीला वाटतं. दूरगामी विचार न्यूयॉर्क शहरातल्या न्यूयॉर्क विद्यापीठाच्या ग्रॉसमन स्कूल ऑफ मेडिसीनमधील मेडिकल एथिक्स विभागाचे संचालक आणि बायोएथिक्सचे प्राध्यापक डॉ. आर्थर कॅप्लान यांच्या मते, हा विचार दूरगामी आहे.
`रॉयटर्स`ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, की `तुम्ही या कंपनीला पैसे द्यायला हवेत. कारण अशा व्यक्ती किंवा भविष्याचा अभ्यास करण्यात माहीर असलेल्या व्यक्ती असा एकच गट तुम्हाला खरोखरच उत्साही होताना दिसेल. भविष्यात विज्ञान माणसांना पुन्हा जिवंत करण्याइतपत प्रगत होईल या आशेवर क्रायोनिक्स टिकून आहे. एका शरीर जतन करण्यासाठी किमान 2,00,000 डॉलर तर फक्त मेंदूसाठी 80,000 डॉलर खर्च येतो.